Photo Credit- X

पुण्यातील ईवाय कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून काम करणाऱ्या तरुणीचा काही दिवसांपूर्वी कामाच्या दबावामुळे मृत्यू झाला होता. कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी ती रात्रंदिवस मेहनत करायची, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. हा आरोप मृत 27 वर्षीय ॲना सेबॅस्टियन पेरेलीच्या आईने केला आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. अशात आता लखनऊमध्ये (Lucknow) अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) अतिरिक्त उप-उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या सदफ फातिमा यांचा येथे मृत्यू झाला. या मृत्यूलाही कामाचा ताण कारणीभूत असल्याचे इतर कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

बँकेत काम करत असताना त्या खुर्चीवरून खाली पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सदफ फातिमा या एचडीएफसी बँकेच्या अतिरिक्त उप-उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. या बँकेची शाखा लखनऊच्या गोमती नगर येथील विभूती खंड शाखेत आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये कामाचा दबाव सारखाच असतो. कर्मचारी 'गरजेपोटी’ काम करत आहेत, त्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांची अवस्था बंधपत्रित मजुरांपेक्षाही वाईट आहे, कारण त्यांना बोलण्याचा अधिकारही नाही. अखिलेश यादव म्हणाले की, सरकारने हे प्रश्न सोडवण्यासाठी उपाय योजावेत, निराधार सल्ले देऊ नये. (हेही वाचा: EY Pune: कामाचा ताण, नव्या नोकरीत अवघ्या 4 महिन्यात चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा मृत्यू; आईचे कंपनीवर गंभीर आरोपांचे पत्र)

पुण्यातील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, 'तुम्ही काहीही अभ्यास करा, नोकरी करा. पण दबाव सहन करण्यासाठी अंतर्गत ताकद आवश्यक आहे. अध्यात्मातून हे साध्य होऊ शकते. देवावर श्रद्धा ठेवल्याने आंतरिक शक्ती वाढते. शैक्षणिक संस्थांनी देवत्व आणि अध्यात्म शिकवले पाहिजे.’ हे लक्षात घेऊन अखिलेश यादव यांनी आता सरकारवर टोला लगावला आहे. मात्र, फातिमाचा मृत्यू कसा झाला हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच समोर येईल.