Thailand: मोबाईल चार्जिंगला लावून गेम खेळणाऱ्या एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : You tube)

मोबाईल चार्जिंगला असतानाही अनेकजण फोनवर बोलणे, गेम खेळणे किंवा इतर काही गोष्टी करत असतात. यातच मोबाईल चार्जिंगला लावून गेम खेळत असताना एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना थायलंड (Thailand) येथे 6 मे रोजी घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.तिच्या मृत्युच्या दोन दिवसांपूर्वीच तिच्या पतीने तिला नवीन स्मार्टफोन गिफ्ट केला होता. संबंधित महिलेला मोबाईलवर गेम खेळण्याची सवय असल्याचे समजत आहे. या घटनेमुळे मोबाईल चार्जिंगला लावला असताना त्याचा वापर करणे धोक्याचे ठरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Yooyen Saenprasert (वय, 54) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती Praiwan Saenprasert हा 6 मे रोजी सायंकाळी कामानिमित्त घराबाहेर पडला होता. त्यावेळी ती घरात एकटीच होती. परंतु, घरी परतल्यानंतर त्याला त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यावेळी तिचा हातही भाजला होता. तिला वाचवण्यासाठी पॅरामेडिक्स त्याठिकाणी आले. परंतु, चार तासांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तिच्या पतीला मोठा धक्का बसला आहे. हे देखील वाचा- Dublin Horror: मुलांकडून रेल्वेस्टेशनवर झालेल्या छेडछाडीदरम्यान एक मुलगी रेल्वे आणि फलाटामधल्या जागेत पडली

यावर मृत महिलेचा पती म्हणाला की, "मी घरी परतल्यानंतर तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती काहीच बोलत नव्हती. तेव्हा मला वाटले की, काहीतरी विपरीत घडले आहे. आम्ही फक्त दोघेच नवरा-बायको होते. आम्हाला मूल-बाळ नाही. तिच्यासोबत असे घडेल, मला वाटले नव्हते. मी तिच्यासाठी दोन दिवसांपूर्वीच नवीन मोबाईल घेतला होता. तिला बेडवर आराम करत असताना मोबाईलवर गेम खेळण्याची सवय होती. परंतु, मोबाईल चार्जिंगला असताना गेम खेळणे धोकादायक ठरू शकते, याची तिला कल्पना नव्हती".