Narendra Modi and Elon Musk | (Photo Credits: Twitter/ ANI)

टेस्लाचे सीईओ (Tesla CEO) आणि ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची न्यूयॉर्क (New York) येथे भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या (USA) चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना इलॉन मस्क म्हणाले,  ते त्यांचे खूप मोठे चाहते आहेत आणि त्यांना भेटून आपला सन्मान झाला. डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात यासाठी तंत्रज्ञान सर्वसमावेशक बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, "मी असे म्हणू शकतो की त्यांना खरोखरच भारतासाठी चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. त्यांना खुले राहायचे आहे, त्यांना नवीन कंपन्यांचे समर्थन करायचे आहे. मी मोदींचा चाहता आहे. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील उद्योगपती आणि काही कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. या भेटीबाबत पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना इलोन मस्क यांनी ट्विट केले की, पंतप्रधान मोदी यांना भेटणे हा माझ्यासाठी एक सन्मान होता. दरम्यान पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, यूएसएमध्ये, मला व्यावसायिक नेत्यांना भेटण्याची, भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची आणि विविध क्षेत्रातील विचारवंतांना भेटण्याची संधी मिळेल. आम्ही व्यापार, वाणिज्य, नवोन्मेष, तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करतो. (हेही वाचा, Elon Musk World's Richest Person: एलन मस्क पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती आहे संपत्ती? घ्या जाणून)

ट्विट

ट्विटरचे मालक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मस्क यांची ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी 2015 मध्ये कॅलिफोर्नियातील टेस्ला मोटर्स कारखान्याच्या भेटीदरम्यान मस्क यांची भेट घेतली होती. मस्क यांनी एएनआयला सांगितले की, "मी भारताच्या भविष्याबद्दल खरोखरच कमालीचा उत्साही आहे. मला वाटते की जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारताकडे अधिक विस्तारीत वचने आहेत. पंतप्रधानांसोबतची ही एक विलक्षण भेट होती आणि मला ते खूप आवडतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी आमच्या कारखान्याला भेट दिली. त्यामुळे आम्ही एकमेकांना काही काळापासून ओळखतो, असेही मस्क या वेळी म्हणाले.