London Terror Attack: लंडनच्या Streatham येथे दहशतवादी हल्ला; अधिकाऱ्यांकडून झालेल्या गोळीबारात दहशतवादी ठार
London Police (Photo Credits: AFP | File)

लंडनमध्ये (London) पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला (Terror Attack) झाला आहे. स्ट्रेथमहॅम भागात एका दहशतवाद्याने चाकूने वार करुन अनेकांना जखमी केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर, प्रत्युत्तरात, सशस्त्र अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यावर गोळीबार केला. या गोळीबारात या व्यक्तीचा मृत्य झाला आहे. सध्या पोलिसांकडून परिस्थितीचा अंदाज घेतला जात आहे, त्या घटनेचा संबंध दहशतवादाशी निगडित असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. रविवारी लोकांना दोन वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तिथे असलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींनी याबाबत माहिती दिली.

ज्या लोकांवर वार झाले आहेत त्यांच्यावर सध्या डॉक्टरांद्वारे उपचार सुरु आहेत. हल्ल्याचे गांभीर्य पाहता आपत्कालीन सुविधा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या घटनेनंतर पोलिस वाहने आणि आपत्कालीन सेवा संपूर्ण भागात तैनात केले असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी तो रस्ता बंद करुन लोकांना त्या ठिकाणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. घटनास्थळी हेलिकॉप्टरद्वारे शोध घेण्यात येत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. (हेही वाचा: London Bridge Attack: लंडन ब्रिज दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन पाकिस्तानशी; Terrorist उस्मान शेखला अटक)

गेल्या तीन महिन्यातील लंडनमधील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यायाधी 29 नोव्हेंबरमध्ये लंडन ब्रिजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानचे कनेक्शन समोर आले होते. पाकिस्तानी वंशाच्या 28 वर्षीय उस्मान खानने (Usman Khan) हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले होते. ब्रिटीश माध्यमांच्या म्हणण्यानुसार, याधीही उस्मानचे नाव दहशतवादी घटनांमध्ये अनेकदा समोर आले आहे. ठार झालेल्या दोन लोकांमध्ये एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे.