Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या आजाराविरुद्ध लस (Vaccine) हे सर्वात मोठे शस्त्र मानले जात आहे. जगभरात अनेक देशांमध्ये वेगाने लसीकरण केले जात आहे. परंतु अजूनही, अनेक ठिकाणी लोक लस घेण्यापासून दूर पळत आहेत. त्यावर आता फिलिपिन्सचे (Philippines) अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्टे (Rodrigo Duterte) यांनी लोकांना इशारा दिला आहे की, देशातील जे लोक लस घेण्यास नकार देतील त्यांची रवानगी तुरुंगात केली जाणार आहे. दुतेर्टे यांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा देशात कोरोना विषाणूचा डेल्टा प्रकार अतिशय वेगाने पसरत आहे.

फिलिपिन्सची एकूण लोकसंख्या 11 कोटी असून 20 जूनपर्यंत देशात केवळ 21 लाख लोकांचेचे पूर्ण लसीकरण झाले आहे. फिलीपिन्सने मार्चमध्ये कोरोना लस देण्याचे काम सुरू केले. परंतु वृत्त आहे की अतिशय कमी लोक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, लस घेत नसलेल्या ‘मूर्ख' लोकांमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यानंतर त्यांनी अशा लोकांना डुकरांची लस देण्याची धमकी दिली. सोमवारी रात्री जनतेला दिलेल्या संदेशात दुतेर्टे म्हणाले की, 'तुमचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, तुम्हाला लस घ्यायची आहे की तुरूंगात जायचे आहे.’ (हेही वाचा: North Korea Food Crisis: उत्तर कोरियामध्ये मोठे अन्नधान्य संकट; एक किलो केळी 3,336 रुपये, तर 'ब्लॅक टी'ची किंमत 5,167 रुपये)

यापूर्वीही फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोना व्हायरस लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना गोळ्या घालण्याची घोषणा केली होती. यानंतर देशात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या बर्‍याच लोकांना गोळ्या घातल्याची कथित घटना समोर आली होती. अध्यक्ष दुतेर्टेने यांनी अमेरिकेलाही धमकी दिली होती त्यांनी कोरोना विषाणूच्या लसी दिल्या नाहीत तर लष्करी करार रद्द केला जाईल.

फिलिपिन्समध्ये आतापर्यंत 1.3 दशलक्षांहून अधिक प्रकरणे आणि 23,000 मृत्यू समोर आले आहेत. यासह देशाची परिस्थिती कोरोनाच्या बाबतीत आशियातील सर्वात वाईट देशांपैकी आहे.