स्पेनमध्ये (Spain) एका मुलाने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलाने आईचा फक्त खुनच केला नाही तर तिच्या शरीराचे हजार तुकडे करून स्वतः खाल्ले (Cannibal) व आपल्या कुत्र्यालाही खायला घातले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. वृत्तानुसार आरोपीविरुद्ध पुरावे सिद्ध झाल्यास त्याला 15 वर्षाची शिक्षा होऊ शकते. आता या तरूणाविरूद्ध न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ही घटना 2019 साली घडली होती. माद्रिद येथील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय अल्बर्टो सान्चेझ गोमेझ (Alberto Sánchez Gómez) याच्यावर आई मारिया गोमेझची हत्या केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्बर्टो सांचेझ गोमेझ हा बेरोजगार वेटर असून तो माद्रिद येथे राहतो. मारिया गोमेझच्या मैत्रिणीने मारिया गायब असल्याची तक्रार नोंदवली होती. याचाच तपास पोलीस करत होते. मैत्रिणीच्या या तक्रारीवरून पोलिस सांचेझच्या घरी पोहोचले. त्यावेळी 68 वर्षीय आई मारिया गोमेझच्या शरीराचे काही भाग फ्रीज आणि प्लास्टिकच्या पिशवीत पडलेले आढळले. पोलिसांनी सांगितले की, ते मारिया गोमेझच्या घरी पोहोचल्यावर सान्चेझने दार उघडला. त्याने पोलिसांना सांगितले की मारिया गोमेझ इथेच आहे मात्र तिचा मृत्यू झाला आहे. सान्चेझकडे याबाबत विचारणा केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. (हेही वाचा: पोलिसाचा खून करून त्याच्या शरीराचे अवयव शिजवून खाल्ले; पिता-पुत्राला 15 वर्षांची शिक्षा)
त्यानंतर अल्बर्टोने सांगितले की, त्याने व त्याच्या कुत्र्याने मारियाच्या शरीराचे तुकडे खाल्ले. आईसोबत वाद झाल्यानंतर अल्बर्टोने त्याच्या आईची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सान्चेझला अटक केल्यानंतर त्याने ट्रायलमध्ये सांगितले की, टीव्ही पाहताना नेहमी त्याला आवाज ऐकू येत असत की त्याने आपल्या आईला ठार मारावे. गोमेझ पुढे म्हणाला की, आईला मारल्यानंतर आपण कधी तिच्या शरीराचे तुकडे खाल्ले हे आठवत नाही. या व्यक्तीच्या अशा विचित्र विधानानंतर त्याच्या मानसिक प्रकृतीबाबतही रुग्णालयात तपास सुरू आहे.