सौदी अरेबियातील (Saudi Arabia) न्यायालयाने एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीचा गुन्हा इतकाच होता की त्याने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट लिहिली आणि यूट्यूबवर (YouTube) कमेंट्स केल्या. आता या शिक्षेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याआधी डॉक्टरेट विद्यार्थिनी सलमा अल-शहाब आणि इतरांना त्यांच्या ऑनलाइन टिप्पण्यांसाठी अनेक दशकांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता मोहम्मद बिन नासेर अल-घामदी याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
ही शिक्षा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देशातील कोणत्याही मतभेदाला शमवण्यासाठी केलेल्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग असल्याचे दिसते. या व्यक्तीने X वर सरकारी भ्रष्टाचारावर टीका केली होती तसेच तुरुंगात असलेल्या एका धार्मिक विद्वानाचा बचाव करण्यासाठी ट्विट केले होते, त्यामुळे याला शिक्षा सुनावण्यात आली.
देशाच्या विशेष फौजदारी न्यायालयाने जुलैमध्ये हा निकाल दिला होता. हे न्यायालय देशातील दहशतवादाशी संबंधित प्रकरणे हाताळते. सोमवारी एएफपीशी बोलताना नासेर अल-घामदीचा भाऊ सईद अल-घामदी म्हणाले की, त्यांच्या भावाला इतर नऊ जणांसह अज्ञात खात्यावरून ट्विट केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सईद अल-घामदी हे ब्रिटनमध्ये राहतात. ते म्हणाले, ‘10 पेक्षा कमी फॉलोअर्स असलेल्या निनावी खात्यावरून ट्विट केल्याबद्दल नागरिकाचा शिरच्छेद केला जात असेल तर, जग सुधारत आहे यावर विश्वास कसा ठेवता येईल?’ (हेही वाचा: Shocking! चुकीच्या पद्धतीने हिजाब घातला म्हणून शाळेने 14 मुलींचे केले मुंडण; Indonesia मधील धक्कादायक घटना)
एएफपीनुसार, मोहम्मद अल-घामदी यांच्यावरील आरोपांमध्ये सौदीच्या नेतृत्वाविरुद्ध कट रचणे, राज्य संस्थांना कमजोर करणे आणि दहशतवादी विचारसरणीचे समर्थन करणे समाविष्ट आहे. लंडनमध्ये स्व-निर्वासित जीवन जगणाऱ्या सईद अल-घामदी यांनी सांगितले की, त्यांचा भाऊ सेवानिवृत्त शिक्षक आहे. सौदी विद्वान अवाद अल-करानी, सलमान अल ओदेह, अली अल ओमारी आणि सफर अल हवाली यांच्या बचावासाठी केलेल्या पोस्टबद्दल त्यांना फाशी देण्यात आली आहे.
या शिक्षेनंतर मुस्लीम अभ्यासक म्हणाले की, देशातील राजकीय वातावरण बिघडले आहे. दडपशाही, दहशत आणि राजकीय अटकेचा अवलंब हा स्वतःचे मत व्यक्त करण्यासाठी किंवा टीकात्मक ट्विट लाइक करण्यासाठी केला जात आहे. याआधी सौदी अरेबियाला मानवी हक्कांची पायमल्ली केल्यामुळे अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. एएफपीच्या आकडेवारीनुसार, सौदी अरेबियामध्ये गेल्या वर्षी 147 जणांना फाशी देण्यात आली. या वर्षात आतापर्यंत 94 जणांना फाशी देण्यात आली आहे.