Shocking! तब्बल 30 वर्षे Toilet मध्ये बनवला जात होता समोसा; प्रशासनाने रेस्टॉरंटला ठोकले टाळे
Samosas (Photo credits: Instagram)

समोसा (Samosa) हा आपल्या देशातील एक असा पदार्थ आहे जो जवळजवळ प्रत्येक राज्यातील लोक आवडीने खातात. कोणत्याही गेट-टू-गदरच्या मेनूमध्ये समोसा पाहायला मिळतो. सकाळी नाश्त्यासाठी असो वा संध्याकाळी भूक लागल्यावर असो, समोसाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अशावेळी हा समोसा नक्की कुठे तयार होतो ती जागा फार महत्वाची ठरते. आता सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अधिकाऱ्यांनी नुकतेच जेद्दाह शहरातील एक रेस्टॉरंट बंद केले आहे. हे रेस्टॉरंट 30 वर्षांहून अधिक काळ आपल्या टॉयलेटमध्ये समोसे आणि इतर स्नॅक्स बनवत असल्याचा आरोप आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्ताचा हवाला देत गल्फ न्यूजने वृत्त दिले आहे की, जेद्दाह नगरपालिकेने निवासी इमारतीतील रेस्टॉरंटवर छापा टाकला होता. येथील अस्वच्छ टॉयलेटमध्ये समोसे व इतर वस्तू शिजवल्या जात असल्याचे आढळून आले. या रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारचे फराळ बनवले जात होते आणि त्यातील काही पदार्थ स्वच्छतागृहे आणि आजूबाजूच्या अस्वच्छ परिसरात बनवले जात होते.

हा किळसवाणा प्रकार 30 वर्षांहून अधिक काळ घडत होता. या वॉशरूममध्ये रेस्टॉरंट नाश्ता, जेवण इत्यादी बनवत असे. याठिकाणी अन्नपदार्थ अतिशय घाणेरड्या पद्धतीने ठेवले होते. मांस आणि चीजवर कीटक आढळले. अन्नपदार्थ बनवण्यासाठी काही गोष्टी तर दोन वर्षांपासून वापरल्या जात होत्या. आता या रेस्टॉरंटवर सौदी अरेबियाच्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे.

येथे छापे टाकल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, उपाहारगृहात अनेक प्रकारच्या कायद्यांचे खुलेआम उल्लंघन होत असल्याचे आढळले. येथील कर्मचाऱ्यांकडे हेल्थ कार्ड नव्हते, रेस्टॉरंटच्या माध्यमातून निवासी कायद्याचेही पालन करण्यात आले नाही. त्यामुळे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. रेस्टॉरंटची दुरवस्था आणि टॉयलेटमध्ये बनवल्या जाणार्‍या स्नॅक्सबाबत स्थानिक माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहेत. सोशल मीडियावरही लोकांनी या रेस्टॉरंटबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. संतप्त सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांनी रेस्टॉरंटवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सौदी अरेबियातील रेस्टॉरंट अस्वच्छ आणि रोगजनक परिस्थितीमुळे बंद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गल्फ न्यूजनुसार, जानेवारीमध्ये जेद्दाहमधील एक प्रसिद्ध शावरमा रेस्टॉरंट देखील बंद करण्यात आले होते. याठिकाणी उंदीर इकडे-तिकडे फिरताना आणि मांस खाताना आढळले होते. सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सतत छापे टाकून रेस्टॉरंट्सची माहिती घेतली जात आहे. तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. धाडी टाकून तत्काळ कारवाई करत 43 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून 26 रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहेत.