
आपल्या ब्रँडची जाहिरात व्हावी, लोक आपल्या ब्रँडकडे आकर्षित व्हावेत याकारणाने अनेक कंपन्या आपले सदिच्छादूत नेमतात. शक्यतो समाजातील प्रतिष्टीत अथवा लोकप्रिय व्यक्तीला कंपन्या सदिच्छा दूत म्हणून प्राधान्य देतात. अशावेळी कंपनीच्या त्या ठराविक उत्पादनासंदर्भातील काही नैतिक जबाबदारीही त्या सदिच्छा दुतावर येते. साहजिकच लोकांसमोर वावरताना आपण एका कंपनीचे सदिच्छा दूत आहोत याचे भान राखणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील दिग्गज कंपनी सॅमसंगने रशियातील आपल्याच ब्रँड अॅम्बॅसिडरला 12 कोटींचा दंड आकारला आहे.
'सेनिया सोबचॅक' असे या सॅमसंगच्या सदिच्छा दूताचे नाव असून, ही एक रशिअन अभिनेत्री आहे. सॅमसंग ऐवजी सार्वजनिक ठिकाणी आयफोनच्या वापर करून, करारातील अटींचा भंग केल्याबद्दल सॅमसंगने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सेनिया यांच्यावर 12 कोटीच्या नुकसानीचा दावा ठोकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार टीव्हीवरील एका मुलाखतीदरम्यान ही अभिनेत्री आयफोन वापरत होती, जेव्हा तिच्या हे लक्षात आले तेव्हा तिने आयफोन पेपरमागे लपवला. मात्र लोकांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. तसेच कंपनीशी असलेल्या करारानुसार सार्वजनिक ठिकाणी ही अभिनेत्री सॅमसंग ऐवजी इतर कोणताही फोन वापरू शकत नाही. या बाबीची सॅमसंगने त्वरीत दखल घेतली आणि झीनिया यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.
सेनिया ही एक अभिनेत्री असून राजकारणीदेखील आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याविरोधात अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणारी ती सर्वात तरुण उमेदवार होती.