Same Sex Marriage: अमेरिकेत समलिंगी विवाहाला मिळाला कायदेशीर दर्जा; जो बिडेन यांनी केली विधेयकावर स्वाक्षरी
Same Sex Marriages | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Same Sex Marriage: अमेरिकेने समलिंगी विवाहांना (Same Sex Marriage) संरक्षण देण्यासाठी कायद्याला मंजुरी दिली आहे. अमेरिकेमध्ये आता समलिंगी विवाह कायदेशीर असणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (President Joe Biden) यांनी समलिंगी विवाह विधेयकावर स्वाक्षरी केली असून आता समलिंगी विवाह कायदा बनला आहे. वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, अमेरिकन काँग्रेसने हा कायदा मंजूर केल्यानंतर मंगळवारी राष्ट्रपतींनीही त्यावर शिक्कामोर्तब केले.

हा कायदा आंतरजातीय आणि समलिंगी विवाहांसाठी क्रांतिकारी निर्णय ठरणार आहे. डेमोक्रॅट्सच्या या निर्णयानंतर अमेरिकेतील लेस्बियन-गे-बायसेक्शुअल-ट्रान्सजेंडर क्वीअर (LGBTQ) समुदायातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेत समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. अखेर आता या समाजाला त्याचे हक्क मिळाले आहेत. (हेही वाचा -Same-Sex Marriage in India: दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारने दर्शवला समलैंगिक लग्नाला विरोध; म्हटले- 'हा मूलभूत अधिकार नाही')

यासंदर्भात बोलताना बिडेन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "अमेरिकेने समानतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. स्वातंत्र्य आणि न्यायाच्या दिशेने केवळ काहींसाठीच नाही, तर सर्वांसाठी, कारण आज मी विवाहाच्या आदर कायद्यावर स्वाक्षरी करतो."

दरम्यान, बिडेन यांनी या कायद्यासाठी लढणाऱ्यांचे कौतुकही केलं आहे. व्हाईट हाऊसच्या निवेदनात, जो बिडेन म्हणाले की, हे विधेयक लक्षणीय फरकाने मंजूर केल्याने LGBTQI+ आणि आंतरजातीय जोडप्यांना मनःशांती मिळेल. हे विधेयक समलैंगिक जोडप्यांच्या मुलांच्या हक्कांची आणि संरक्षणाची हमी देते.

वैवाहिक समानतेसाठी लढणाऱ्या जोडप्यांचे आणि वकिलांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना बिडेन यांनी सर्वोच्च न्यायालय आणि काँग्रेसमध्ये देशव्यापी वैवाहिक समानता मिळवण्यासाठी अनेक दशकांपासून लढा देणाऱ्या जोडप्यांचे आणि कार्यकर्त्याच्या वकिलांचे कौतुक केले.