कोरोना व्हायरस (Coronavirus) लस तयार करण्यात गुंतलेले एक रशियन शास्त्रज्ञ (Russian Scientist) संशयास्पद मृतावस्थेत आढळले आहेत. वृत्तानुसार 45 वर्षीय शास्त्रज्ञ अलेक्झांडर साशा कागनस्की (Alexander Sasha Kagansky) आपल्या फ्लॅटच्या 14 व्या मजल्यावरून पडले. घटनेच्या वेळी ते फक्त अंडरवेअरवर होते. त्यांच्या शरीरावर चाकूच्या हल्ल्याच्याही अनेक खुणा व जखमा आहेत. अलेक्झांडर कोरोनाच्या कोणत्या लसीवर कार्य करत होते हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे वय 45 वर्षे आहे. कागनस्की यांचे यूकेमधील एडिनबर्ग विद्यापीठाशी संबंध होता. कागनस्कीने सुमारे 13 वर्षे स्कॉटलंडमध्ये काम केले होते.
रशियन मीडियाच्या वृत्तानुसार, फ्लॅटच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडण्यापूर्वी कागनस्की यांचे कोणाशीतरी भांडण झाल्याचे पोलिसांचे मत आहे. अलेक्झांडरच्या मृत्यूला ते संभाव्य खून मानतात आणि अटक केलेल्या 45 वर्षांच्या व्यक्तीची चौकशी करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कागनस्की यांनी रशियातील एका विद्यापीठात सेंटर फॉर जीनोमिक आणि रीजनरेटिव्ह मेडिसिनचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. अलीकडेच रशियन सरकारने त्यांना संशोधनासाठी अनुदान दिले होते. (हेही वाचा: Italy मध्ये आढळला Britain मधील कोरोना वायरसच्या नव्या प्रजातीच्या विषाणूची लागण झालेला रूग्ण)
कागनस्की हे रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील एका उंच इमारतीच्या 14 व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडले. 19 डिसेंबर रोजी एका महिलेला त्यांचा मृतदेह आढळला. कागनस्की हे आपल्या नातेवाईकांच्या कबरीला भेट देण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग येथे आले होते. मृत्यूच्या आधी ते त्यांच्या एका जुन्या शाळेच्या मित्रालाही भेटले होते. दरम्यान, सध्या सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे अनेक देश चिंतेत आहेत. मात्र रशियाची स्पुतनिक व्ही ही लस युरोपमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराच्याविरूद्ध तितकीच प्रभावी ठरेल, जितकी सध्याच्या कोरोना विषाणूविरूद्ध प्रभावी आहे, असे कंपनीने म्हटले आहे.