Russia Ukraine War (PC- PTI)

Russia Ukraine War: रशियाच्या घोषणेनंतर युक्रेनमधील परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. युक्रेनची राजधानी कीवसह अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. एवढेच नाही तर हे हल्ले टाळण्यासाठी युक्रेनचे नागरिक सुरक्षित ठिकाणी जात आहेत. खरे तर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध 'लष्करी कारवाई' करण्याची घोषणा केली आहे. युद्ध टाळता येत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी हा आदेश जारी करत म्हटले आहे की, युक्रेन मागे हटले नाही तर युद्ध सुरूच राहील. पुतिन यांनी युक्रेनच्या लष्कराला शक्य तितक्या लवकर शस्त्रे टाकण्याची धमकी दिली आहे. अन्यथा युद्ध टाळता येणार नाही, असं म्हटलंय. त्याचवेळी युक्रेनमधून सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावरही अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याचा दावा करत आहे.

युक्रेनमधील परिस्थितीवर परराष्ट्र मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आकस्मिक योजना राबविण्यात येत आहेत. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे स्थलांतराचे पर्यायी मार्ग कार्यान्वित केले जात आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, मी उद्या G7 च्या नेत्यांची भेट घेईन आणि युनायटेड स्टेट्स आणि आमचे मित्र देश एकत्र येऊन आम्ही रशियावर कठोर निर्बंध लादू. आम्ही युक्रेनमधील नागरिकांना पाठिंबा आणि मदत करू. (वाचा - Ukraine Russia Crisis: रिपोर्टरने रशिया-युक्रेन संकट 6 भाषांमध्ये केले कव्हर; सोशल मीडियावर व्हायरल होताय 'हा' व्हिडिओ)

रशियन हल्ल्यात 7 ठार -

रशियाच्या हल्ल्यात किमान 7 जण ठार आणि नऊ जखमी झाल्याचे युक्रेनने सांगितले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, ब्रोव्हरी आणि कीवमध्ये एक व्यक्ती ठार झाली आहे, तर एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या युक्रेनमध्ये गोळीबार होत आहे.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती पाहता डेन्मार्कच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनची राजधानी कीव येथील दूतावास बंद केला आहे. रॉयटर्सच्या मते, डेन्मार्कने सुरक्षेचे कारण देत दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

युक्रेनच्या दोन शहरांचा ताबा -

रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांनी युक्रेनच्या लुहान्स्क भागातील दोन शहरांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे, असे रॉयटर्सचे वृत्त आहे.

भारतीय दूतावासाने जारी केली Advisory -

युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने एक नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. सध्या परिस्थिती वाईट आहे, त्यामुळे जिथे आहात तिथेच थांबा, असे अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. लोकांना त्यांच्या घरी आणि वसतिगृहात राहण्यास सांगण्यात आले आहे. जे लोक युक्रेनची राजधानी कीव किंवा वेस्टर्न कीव्हच्या दिशेने गेले आहेत त्यांनी त्यांच्या घरी परतावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.