आपले एखादे काम जे शेवटच्या घटका मोजत असलेल्या व्यक्तीच्या ओठावर हसू आणेल, यापेक्षा अजून सुंदर या जगात काय असू शकेल. अशीच एक गोष्ट अमेरिकेमध्ये घडली आहे. अमेरिकेतील मिशिगन येथील एका रेस्टॉरंटने तब्बल 800 किमी. दूर कर्करोगाशी झुंज देत असलेल्या एका व्यक्तीला पिझ्झा पोहचवण्याचे कार्य केले आहे. ज्युली मॉर्गन हिने ही घटना आपल्या फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली आहे.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ज्युली आणि रिच मॉर्गन हे दाम्पत्य 25 वर्षांपूर्वी मिशिगन येथे राहत होते. त्या परिसरातील ‘स्टीव्हज पिझ्झा’ हे त्यांचे पिझ्झा खाण्याचे आवडते ठिकाण होते. त्यानंतर ते इंडियानापोलिस येथे स्थलांतरीत झाले. नवीन ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतरही त्यांना त्यांच्या आवडत्या पिझ्झाची नेहमीच आठवण होत असे. यामुळेच या दोघांनी फक्त पिझ्झ्यासाठी एकदा का होईना पण मिशिगनला जायचे असे ठरवले. दोघांनी ट्रीपचे आयोजन केले, मात्र मिशिगनला जाण्याआधीच रिचची तब्येत खराब झाली. त्याला 5 दिवसांसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला कर्करोग निदान करून रिच अतिशय कमी दिवसांचा सोबती असल्याचे सांगितले.
त्यानंतर ज्युलीच्या वडिलांनी रिचला थोडे बरे वाटावे म्हणून, स्टीव्ह पिझ्झाला फोन करून ते एखादे चिअर अप कार्ड किंवा तत्सम गोष्ट रिचला पाठवू शकता का? अशी विचारणा केली. मात्र रेस्टॉरंटचा मॅनेजर डाल्टन याने यावर जे काही सांगितले ते आश्चर्यचकित करणारे होते. डाल्टनने रिचला आवडणाऱ्या पिझ्झ्याची विचारणा केली, यावर ज्युलीच्या वडिलांनी ते मिशिगनपासून 800 किमी. दूर राहत असल्याचे सांगितले यावर डाल्टनने तो स्वतः ड्राईव्ह करून रिचचा आवडता पिझ्झा पोहोचवेल असे सांगितले.
खरोखरच एके रात्री 12.30वा. डाल्टनने रिचच्या घराची बेल वाजवली. रिचच्या आवडत्या पिझ्झ्यासोबतच डाल्टन अजून 2 एक्स्ट्रा पिझ्झा घेऊन आला होता. अगदी चित्रपटा कथा वाटावी अशी ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. डाल्टनने जे केले त्यावरून खरोखर या जगात माणुसकी शिल्लक असल्याच्या गोष्टीवर विश्वास बसतो.