Panama Papers Scandal: पनामा पेपर्स खटल्यात अनेक बड्या व्यक्तींना दिलासा; मनी लाँड्रिंगच्या आरोपातून 28 जणांची निर्दोष मुक्तता
Law gavel lights प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Panama Papers Scandal: पनामा पेपर्स प्रकरणात (Panama Papers Case), करचोरी आणि मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा (Money Laundering Scandal) हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. काही वर्षांपूर्वी या प्रकरणातील खुलाशांनी जगभरातील अनेक देशांमध्ये खळबळ उडवून दिली होती. या खुलाशात जगातील अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर आली होती. आता या व्यक्तींना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. पनामा पेपर्स घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या 28 जणांची पनामाच्या न्यायालयाने मनी लाँड्रिंगच्या आरोपातून शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.

न्यायमूर्ती बालोसा मार्कीनेझ यांनी बंद पडलेल्या पनामानियन लॉ फर्म मॉसॅक फोन्सेकाशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप असलेल्या 28 जणांना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. निर्दोष सुटलेल्यांमध्ये फर्मचे संस्थापक जर्गेन मॉसॅक आणि रॅमन फोन्सेका यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Aishwarya Rai ED Summoned: पनामा पेपर्स प्रकरणात ऐश्वर्या राय-बच्चन चौकशीसाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर)

एप्रिलमध्ये पनामा सिटीमध्ये झालेल्या खटल्यादरम्यान, या दोघांना 12 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तथापि, लॉ फर्मच्या सर्व्हरवरून गोळा केलेले पुरावे योग्य प्रक्रियेनुसार गोळा केले गेले नाहीत, असे न्यायाधीश मार्कीनेझ यांना आढळून आले. ज्यामुळे त्याच्या प्रामाणिकता आणि सचोटीबद्दल शंका निर्माण झाली. तथापी, या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीश म्हणाले की, उर्वरित पुरावे प्रतिवादींची गुन्हेगारी जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुरेसे आणि निर्णायक नाहीत. 2016 मध्ये Mossack Fonseca कडून लीक झालेल्या दस्तऐवजांवरून पनामा पेपर्स घोटाळा उघडकीस आला होता. जगभरात या प्रकरणाचा तपास करण्यात आला.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी, अर्जेंटिनाचे तत्कालीन अध्यक्ष मॉरिसिओ मॅक्री आणि स्पॅनिश चित्रपट निर्माते पेड्रो अल्मोडोवर यांचाही पनामा पेपर्स घोटाळ्यात समावेश आहे.