Refugee Crisis (Photo Credit : Pixabay)

सुदान (Sudan) संकट आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे (Ukraine Wars) जगातील निर्वासितांचे संकट पुन्हा एकदा गडद झाले आहे. युनायटेड नेशन्समधील निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तांनी सांगितले की, संघर्ष, छळ आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यामुळे सुमारे 110 दशलक्ष लोकांना त्यांची घरे सोडावी लागली.

युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज (UNHCR) चा 2022 चा 'ग्लोबल ट्रेंड रिपोर्ट' बुधवारी जाहीर होण्याआधी, संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीचे प्रमुख फिलिपो ग्रँडी (Filippo Grandi) यांनी जिनिव्हा येथे सांगितले की, ‘निर्वासितांची अवस्था आणि त्यांना भोगाव्या लागलेल्या यातना या जगातील सामाजिक व्यवस्थेवर लागलेला काळा डाग आहे.’

गेल्या वर्षी सुमारे 19 दशलक्ष लोक विस्थापित झाले, त्यापैकी 11 दशलक्षाहून अधिक लोकांना युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे आपली घरे सोडावी लागली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने लोक युद्धामुळे विस्थापित झाले. (हेही वाचा: Nova Kakhovka Dam Collapse: युक्रेनला मोठा धोका, 'नोव्हा काखोव्का' धरण फुटल्याने आला मोठा पुर; मोठ्या प्रमाणात नुकसान)

ग्रँडी म्हणाले की, जग सतत आणीबाणीचा सामना करत आहे. गेल्या वर्षी 35 आपत्कालीन घटनांची नोंद झाली, जी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तीन ते चार पट अधिक आहे. मात्र यातील फार कमी घटना माध्यमांद्वारे जगासमोर आल्या. ग्रँडी यांनी सांगितले की, सुदानमधून पाश्चात्य नागरिकांना हद्दपार केल्यानंतर, तेथील संघर्षाच्या बातम्या बहुतेक वर्तमानपत्रांमधून गायब झाल्या होत्या.

सुदानमधील संघर्षामुळे एप्रिलपासून सुमारे दोन लाख लोक विस्थापित झाले आहेत. त्याच वेळी, काँगो प्रजासत्ताक, इथियोपिया आणि म्यानमारमधील संघर्षामुळे सुमारे दहा लाख लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. यासोबतच ग्रँडी यांनी 2022 मध्ये पुनर्स्थापित निर्वासितांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट होऊन 114,000 झाली आहे हे सकारात्मक असल्याचे नमूद केले. मात्र ही संख्या अजूनही फार कमी असल्याचे ते म्हणाले.