पाकिस्तानमध्ये (Pakistan) केवळ अर्थव्यवस्थाच नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेचाही बोजवारा उडाला आहे. देशात महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Abuse) घटना वाढत आहेत. अगदी दररोज महिलांच्या असुरक्षिततेच्या बातम्या समोर येत आहेत. अशात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी देशातील वास्तविकता नमूद करत आहे. महिला आणि मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभुमीवर पंजाब प्रांताच्या अधिकाऱ्यांनी ‘आणीबाणी’ (Emergency) घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाबचे गृहमंत्री अता तरार यांनी रविवारी सांगितले की, प्रशासनाला ‘बलात्काराच्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी आणीबाणी जाहीर करणे भाग पडले. मंत्री पुढे म्हणाले की, प्रांतातील महिला आणि मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ ही समाज आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी गंभीर समस्या बनली आहे. 'डॉन' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना मंत्री म्हणाले, ‘पंजाबमध्ये दररोज चार ते पाच बलात्काराची प्रकरणे नोंदवली जात आहेत, ज्यामुळे सरकार त्यावर विशेष उपाययोजना करण्याचा विचार करत आहे.
कायदा मंत्री मलिक मुहम्मद अहमद खान यांच्या उपस्थितीत, तरार म्हणाले की, बलात्कार आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर कॅबिनेट समितीद्वारे आढावा घेतला जाईल आणि अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागरी संस्था, महिला हक्क संघटना, शिक्षक आणि वकील यांचाही सल्ला घेतला जाईल. तरार यांनी पालकांना त्यांच्या मुलांना सुरक्षिततेचे महत्त्व शिकवावे आणि मुलांना त्यांच्या घरात एकटे सोडू नये, असे आवाहन केले. (हेही वाचा: Pakistan: पाकिस्तानमध्ये महिला क्रिकेटपटूचा विनयभंग, राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक निलंबित, व्हिडीओच्या माध्यमातून करायचा ब्लॅकमेल)
मंत्र्यांनी सांगितले की, लैंगिक छळाबाबत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जागरुक केले जाईल. तसेच सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी विविध मोहिमा सुरू केल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. लवकरच सर्व प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल. तरार म्हणाले की, आजच्या युगात मोठमोठ्या शाळांमध्ये ड्रग्ज घेणे ही एक फॅशन बनली आहे, त्यामुळे असे गुन्हे वाढत आहेत.