LinkedIn कंपनी आपल्या 15,900 कर्मचाऱ्यांना 'रिचार्ज' होण्यासाठी देणार एक आठवड्याची पगारी रजा
LinkedIn (Photo Credits: PixaBay)

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोक-या गेल्या. अशा बेरोजगारांना नोकरीच्या संधीविषयी माहिती देण्यासाठी पुढे सरसावलेल्या लिंक्डइन कंपनीने या काळात मदतीचा हात पुढे केला. त्यासाठी या कंपनीची टीम अहोरात्र झटली. त्यामुळे त्यांचे हे परिश्रम पाहता त्यांना थोडे दिवस विश्रांती देण्याच्या उद्देशाने या कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लिंक्डइनने (LinkedIn) आपल्या सर्व 15,900 कर्मचा-यांसाठी एका आठवड्याची पगारी रजा देण्याचे ठरवले आहे. ही सुट्टी सर्व कर्मचा-यांना पुढच्या आठवड्यात मिळणार आहे. आपल्यावर आलेल्या कामाच्या ताणतणावापासून थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा काम करण्यास रिचार्ज व्हावं असा उद्देश ही सुट्टी देण्यामागचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केलय.

AFP ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर लिंक्डइनच्या कर्मचा-यांना फुलपगारी सुट्टी देण्यात आली आहे. लिंक्डइनच्या अधिकारी तेइला हॅन्सन या म्हणाल्या की, कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी मौल्यवान गोष्ट द्यायची होती आणि सध्याच्या काळात वेळ ही गोष्टच सर्वात मौल्यवान आहे असं कंपनीच्या प्रशासनाला वाटतंय. त्यामुळे येत्या काळात कंपनीची प्रगती करायची असेल तर कर्मचारी आनंदी राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची पगारी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हेदेखील वाचा- ISRO Recruitment 2021: इस्रो मध्ये 'या' पदांसाठी नोकर भरती, येत्या 21 एप्रिल पर्यंत उमेदवारांना करता येणार अर्ज

कर्मचा-यांवर कामामुळे येणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचारीही आनंदी आहेत. या सुट्टीमुळे त्यांना मानसिक आणि शारीरिकरित्या आराम मिळेल तसेच आपल्या कुटूंबासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. आता कंपनीचे सर्वच कर्मचारी रजेवर असल्याने कोणालाही कामासंबधी मेल, मीटिंगचे फोन्स किंवा इतर काही गोष्टींचा या काळात काही त्रास होणार नाही.

कंपनीच्या 15,900 कर्मचाऱ्यांना रजा मिळणार आहे पण या काळात लिंक्डइनच्या कोअर टीमचे सदस्य काम करत राहणार आहेत. हे सदस्य नंतर आपल्या वेळेप्रमाणे रजा घेणार आहेत. कोरोनामुळे कंपनीचे कर्मचारी गेले वर्षभर वर्क फ्रॉम होम करत आहेत.