Coronavirus: स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा चा कोरोनामुळे मृत्यू
Princess Maria Teresa (PC - ANI)

Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे जगात पहिल्यांदा एका राजघराण्यातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. स्पेनचे राजे फिलीप IV यांची चुलत बहिण राजकुमारी मारिया टेरेसा (Princess Maria Teresa) यांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मारिया 86 वर्षांच्या होत्या. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्या मारिया या राजघराण्यातील पहिल्या बळी ठरल्या आहेत. मारिया यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना दोन ते तीन दिवसांपासून व्हेटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

प्राप्त माहितीनुसार, मारिया यांच्या भावाने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मारिया यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. येत्या शुक्रवारी मारिया यांच्यावर मॅड्रिड येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मारिया यांचा जन्म 1933 मध्ये पॅरिसमध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण फ्रान्समध्ये झाले होते. मारिया या पॅरिमधील एका विद्यापीठामध्ये प्रोफेसर होत्या. परदेशी मीडियाच्या रिपोर्टनुसार, मारिया टेरेसा यांना 'रेड प्रिंसेस' नावाने ओळखलं जात होतं. (हेही वाचा - Coronavirus: इटली येथे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर पोहचला-AFP यांची माहिती)

मारिया टेरेसा या सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असतं. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने स्पेनमध्येही दहशत माजवली आहे. चीन, इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात स्पेनमध्ये 844 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोना बधितांची रुग्णांची संख्या आतापर्यंत 73 हजारहून अधिक झाली आहे. त्यामुळे स्पेन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जगभरात कोरोना व्हायरसच्या विळख्या अनेक दिग्गज नेते तसेच कलाकार अडकले आहेत. यातील अनेकांनी सोशल मीडियावर आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले आहे. तसेच स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे यातील अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दुर्दैवाने कोरोनासोबतच्या लढाईत मारिया टेरेसा यांना यश आलं नाही. त्यामुळे राजे फिलीप यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.