कॅथोलिक चर्चचे विद्यमान प्रमुख, रोमचे बिशप आणि व्हॅटिकन सिटी राज्याचे सार्वभौम पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांच्या काही विधानांची जगभरात चर्चा होत आहे. पोप फ्रान्सिस यांनी सेक्स (Sex) ही एक सुंदर गोष्ट असल्याचे म्हटले आहे. डिस्ने प्रॉडक्शन डॉक्युमेंटरी ‘द पोप आन्सर्स’ (The Pope Answers) मध्ये त्यांनी हे भाष्य केले आहे. पोप फ्रान्सिस, 86, यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीपटात सेक्सच्या गुणांची प्रशंसा करत ही ‘देवाने मानवाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी एक’ असल्याचे म्हटले.
पोप यांनी गेल्या वर्षी रोममध्ये 20 वर्षांच्या दहा तरुणांसोबत संवाद साधला होता, हा माहितीपट त्यावर आधारित आहे. डॉक्युमेंटरीमध्ये एलजीबीटी (LGBT) अधिकार, गर्भपात, सेक्स, पॉर्न उद्योग, कॅथोलिक चर्चमधील लैंगिक शोषण यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लैंगिक संबंधांबद्दल बोलताना, पोप फ्रान्सिस यांनी हस्तमैथुनाचा संदर्भ दिला आणि म्हटले की, ‘स्वतःला लैंगिकरित्या व्यक्त करणे ही एक समृद्धी आहे.’
पोप फ्रान्सिस यांना जेव्हा नॉन बायनरी लोकांबद्दल त्यांचे मत विचारले तेव्हा ते म्हणाले की, एलजीबीटी लोकांचे कॅथोलिक चर्चने स्वागत केले पाहिजे. सर्व पुरुष देवाची मुले आहेत. देव कोणालाही नाकारत नाही, देव पिता आहे आणि मला चर्चमधून कोणाचीही हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही.
गर्भपाताबाबत पोप फ्रान्सिस म्हणाले की, धर्मगुरूंनी गर्भपात करणाऱ्या महिलांशी दयाळूपणे वागले पाहिजे. मात्र, गर्भपाताची प्रथा मान्य करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोप म्हणाले, 'एखाद्या महिलेचा गर्भपात झाला असेल, तर तिला पाठिंबा देणे ही एक गोष्ट आहे आणि गर्भपाताचे समर्थन करणे ही दुसरी गोष्ट आहे.' (हेही वाचा: Porn Videos: चर्चचे नन्स आणि पादरीदेखील इंटरनेटवर पाहतात अश्लील व्हिडिओ; ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते Pope Francis यांची कबुली)
पोप यांच्या या टिप्पण्या व्हॅटिकन चर्चचे अधिकृत वृत्तपत्र L'Osservatore Romano ने देखील प्रकाशित केल्या आहेत. पोपच्या तरुणांशी झालेल्या या संभाषणाला वृत्तपत्राने 'खुले आणि प्रामाणिक संभाषण' म्हटले आहे. सोशल मीडियावर या डॉक्युमेंट्रीची खूप चर्चा होत असून, यूजर्स पोपच्या कमेंटचे कौतुक करत आहेत.