Philippines Plane Crash: फिलीपिन्स मध्ये 92 लोकांना घेऊन जाणारे सैन्य विमान कोसळले; आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 40 जणांना वाचवण्यात यश
Philippines Plane Crash (Photo Creduts: Twitter)

फिलिपिन्सच्या (Philippines) दक्षिणेकडील भागात लँडिंग करताना मिलिट्री ट्रांसपोर्ट एअरक्राफ्ट सी-130 हरक्यूलिसचा अपघात झाला आहे. अपघातावेळी विमानात 92 जण होते. मदत आणि बचावकार्यात गुंतलेल्या लोकांनी विमानामधून 40 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. बचावकर्त्यांना आतापर्यंत 17 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही बर्‍याच लोकांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी हिंसाचारग्रस्त बेटावर जाताना विमान बंडखोर हल्ल्याला बळी ठरल्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र फिलिपिन्सच्या सैन्याने हे दावे फेटाळले आहेत.

फिलिपीनचे लष्कर प्रमुख जनरल सिरिलितो सोबेजाना (Cirilito Sobejana) म्हणाले की सुलु प्रांतातील जोलो बेटावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना हे विमान कोसळले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. फिलिपिन्स एअर फोर्सच्या नेतृत्वात एव्हिएशन अधिकाऱ्यांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. सांगितले जात आहे की हे परिवहन विमान दक्षिण कॅग्यान डी ओरो शहरातील सैनिकांना घेऊन जोलो बेटवर जात होते.

लँडिंगच्या वेळी, पायलटला रनवेवर विमान लँड करता आले नाही. ज्यामुळे विमान धावपट्टीच्या बाजूला असलेल्या झाडांमध्ये कोसळले. या धडकीमुळे विमानात भरलेल्या अत्यंत ज्वलनशील इंधनाला आग लागली असावी. मध्य फिलिपिन्समध्ये पाऊस पडत आहे, परंतु खराब हवामानामुळे हा अपघात झाला आहे की नाही हे स्पष्ट झाले नाही. (हेही वाचा: 'Covid-19 च्या अत्यंत धोकादायक टप्प्यावर आहे जग, जवळपास 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा उद्रेक'; WHO ने व्यक्त केली चिंता)

एएफपीच्या म्हणण्यानुसार, विमानातील बहुतांश सैनिकांनी मूलभूत प्रशिक्षण घेतले होते. या सैनिकांना दहशतवादी कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुस्लिम-बहुल आयलँडवर तैनात करण्यासाठी घेऊन जात होते. फिलिपिन्सच्या या बेटांवर एखाद्याचे खंडणीसाठी अपहरण केले जाणे सामान्य आहे, म्हणूनच येथे नेहमीच मोठ्या संख्येने सैनिक तैनात असतात. येथे अबु सैय्यफ नावाची दहशतवादी संघटना कार्यरत आहे.