पाकिस्तानचा वरिष्ठ अधिकारी निघाला पाकीटचोर; चक्क कुवैतच्या राजदूताच्या पाकिटावर मारला डल्ला (व्हिडीओ)
पाकीट चोरताना अधिकारी (Photo Credits Twitter)

अनेक कारणांमुळे पाकिस्तानचे नाव संपूर्ण जगात खराब आहे. स्वतःच्या कुरघोड्या, कारवाया, शासन अशा अनेक गोष्टींमुळे जगासमोर पाकिस्तानचे नेहमीच हसू होते. आता परत एकदा पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर खाली मान घालण्याची पाळी आली आहे. कारण पाकिस्तानच्या एका वरिष्ठ नेत्याने चक्क पाकीट चोरले आहे, आणि आश्चर्य म्हणजे हे पाकीट होते कुवैतच्या राजदूताचे. तपासणी केली असता या अधिकाऱ्याकडून कुवेती दिनारने भरलेले पाकीट जप्त केले आहे.

अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडली होती जेव्हा, कुवेती प्रतिनिधी पाकिस्तान-कुवेत संयुक्त मंत्रिस्तरीय मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला आले होते. दरम्यान कुवैतच्या राजदूताने आपले पैशांचे पाकिट चोरीला गेले आहे अशी तक्रार केली. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांकडे कसून चौकशी केली गेली, मात्र काहीच हाती लागले नाही. शेवटी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता गुंतवणूक आणि सुविधा विभागाचे संयुक्त सचिव जर्रार हैदर खान यांनी कुवैतच्या राजदूताचे पैशांचे पाकिट टेबलावरून उचलून आपल्या कोटाच्या खिशात घातल्याचे उघडकीस आले.

बैठकीनंतर सर्व लोक हॉल बाहेर गेले असता, जर्रार हैदर खान टेबलाजवळ आले. त्यांना टेबलवर दिनारने भरलेले पाकीट दिसले आणि लगेच त्यांनी कोणताही विचार न करता ते आपल्या कोटाच्या खिशात घातले. पाकिस्तानी पत्रकार उमर कुरैशी यांनी ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने 'हे कृत्य ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. देशातील अधिकाऱ्यांसाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे’ म्हटले आहे.

दरम्यान, आरोपी जर्रार खानला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.