Pakistan: ट्रान्सजेन्डर व्यक्तीला रेशनच्या बदल्यात सरकारी अधिकाऱ्यांनी नाचायला भाग पाडले; व्हिडीओ व्हायरल, चौकशीचे आदेश (Watch)
पाकिस्तान ट्रान्सजेन्डर )संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या पाकिस्तान (Pakistan) मोठ्या आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. आपल्या धोरणांनी आणि कृतीने हा देश गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, तेथील सर्वसामान्य जनतेसाठी धान्याचा अगदी एक कणही महत्वाचा झाला आहे. त्यात भ्रष्ट सरकारी अधिकारीही याचा फायदा घेत आहेत. सध्या पाकिस्तानमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सरकारी कार्यालय एक ट्रान्सजेन्डर (Transgender) व्यक्ती नृत्य करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ गुजरावालाचा आहे. या तृतीयपंथी व्यक्तीने सांगितले की, अधिकाऱ्यांनी तिला रेशन देण्याऐवजी आपल्या ऑफिसमध्ये डान्स करण्यास भाग पाडले. रेशनच्या बदल्यास सरकारी अधिकाऱ्यांच्या मनोरंजनासाठी ही तृतीयपंथी व्यक्ती सरकारी कार्यालयात नृत्य करत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ज्या अधिकाऱ्यावर हा आरोप झाला आहे, त्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पाकिस्तानच्या कमकुवत अर्थव्यवस्थेचे हे पहिले उदाहरण नाही. याचा नमुना तेथील खाद्यपदार्थ आणि इतर घरगुती वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किमतींवरून दिसून येत आहे. अगदी पीठ आणि डाळीही लोकांच्या आवाक्‍याबाहेर होत आहेत देशातील सोन्याचा भाव इतर इतका वाढला आहे की, आता पाकिस्तानात दोन लाख रुपये प्रति तोळा दराने सोने मिळत आहे. दुसरीकडे, वीज आणि ऊर्जा संकटामुळे पाकिस्तान आधीच अडचणीत आहे. रात्री 8 वाजेपर्यंत बाजार आणि मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. तिथल्या मंत्र्यांनी चहापान बंद करण्याचा आग्रह धरला आहे. (हेही वाचा: Blast In Peshawar: पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत स्फोट, अनेक जण ठार झाल्याची भीती)

पाकिस्तानमध्ये मोहरीचे तेल 553 रुपये प्रति लिटर, दूध 150 रुपये प्रति लिटर, मैदा 150 रुपये किलो आणि तांदूळ 147 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 10,000 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पाकिस्तानातील महागाईचा दर जवळपास 32 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाकिस्तानमध्ये कांदा 482 टक्क्यांनी महागला आहे. चहा 65 टक्क्यांनी, अंडी 64 टक्क्यांनी आणि मीठ 50 टक्क्यांनी महागले आहेत.

पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 268.50 रुपयांच्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आहे. अशाप्रकारे पाकिस्तानात लोकांना पोट भरणे आता कठीण झाले आहे व यामुळे आता लुटमारीची परिस्थिती आली आहे. लष्कराचे तळही सुरक्षित नाहीत. अलीकडेच काही लोकांनी लष्कराच्या मुख्यालयातील पोल्ट्री फार्म लुटला. इथे सुमारे 12 जण शस्त्रांसह आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेऊन 30 लाख रुपये किमतीच्या 5 हजार कोंबड्या लुटल्या.

पाकिस्तानला कुठूनही मदत न मिळाल्यास मे 2023 पर्यंत देश दिवाळखोरीत निघेल, असे बोलले जात आहे. विदेशी संस्थांनीही पाकिस्तानला मदतीच्या बदल्यात आपल्या धोरणांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानची परिस्थिती अशी झाली आहे की, त्याच्याकडे आता गोष्टींसाठी पैसे भरण्यासाठी परकीय चलन नाही. यामुळे अनेक विदेशी कंटेनर बंदरांवर तसेच पडून आहेत.