पाकिस्तान कडून काल (1जुलै) लोकप्रिय मोबाईल गेम PUBG तात्पुरता बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान PlayerUnknown's Battlegrounds या खेळाचं व्यसन लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या खेळामुळे अनेकांनी आत्महत्येचे देखील प्रयत्न केले आहेत. दरम्यान पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीद्वारा देण्यात आलेल्या माहितीनुसार, पबजी खेळामुळे मुलांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.
PTA, या पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीद्वारा देण्यात आलेल्या पत्रकामध्ये लाहौर उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान तक्रारकर्त्यांच्या सूचना ऐकून तसेच या प्रकरणी सुनावणीनंतर पुढील निर्णय घेण्याचे आदेश आहेत. पुढील सुनावणी 9 जुलै दिवशी होणार आहे.
पाकिस्तानी मीडीयाच्या वृत्तांनुसार, पबजी गेममध्ये मिशन पूर्ण करू न शकल्याने अनेक तरूण टोकाची पावलं उचलत आहेत. पाकिस्तानात 24 जूनला एका 16 वर्षीय तरूणाने हंजरवाल भागामध्ये आपल्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. मोहम्मद जकारिया असं त्याचं नाव असून फॉरंसिक खात्याच्या अधिकार्यांनी तपास केल्यानंतर त्याच्या आत्महत्येमागे मिशन पूर्ण न झाल्याचं नैराश्य असल्याचं सांगितलं जात आहे.
2017 मध्ये दक्षिण कोरियाच्या एका कंपनीकडून पबजी हा सर्व्हायल गेम बनवण्यात आला आहे. यामध्ये खेळाडूंना दुसर्यांविरूद्ध युद्ध करण्यासाठी एका बेटावर सोडलं जातं. मल्टिपलेयर असणार्या या गेममध्ये जगभरातील ऑनलाईन गेमर्सची टीम बनवली जाते आणि त्यांना एकमेकांविरूद्ध खेळता येते. या खेळात एकमेकांवर हल्ले, प्रति हल्ले केले जातात. जितक्या अधिक लोकांचा तुम्ही खात्मा कराल तितक्या अधिक तुमची जिंकण्याची शक्यता. यंदा जगभरात 3.42 कोटी वेळा हे गेम डाऊनलोड झाला आहे.