Pakistan Flag | (File Image)

Pakistan General Elections: पाकिस्तानच्या सिनेटने (Pakistan Senate) देशात 8 फेब्रुवारी रोजी होणार्‍या राष्ट्रीय निवडणुका (National Elections) पुढे ढकलण्याचा ठराव मंजूर केला आहे. स्थानिक माध्यमांनी याबाबत माहिती दिली. देशाच्या संसदेच्या वरच्या सभागृहाने शुक्रवारी स्वतंत्र सिनेटरने मांडलेला ठराव मंजूर केला. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पाकिस्तानमध्ये निवडणुका या मूळतः गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, म्हणजेच ऑगस्टमध्ये संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित झाल्यानंतर 90 दिवसांनी होणार होत्या. परंतु नवीन जनगणनेनुसार मतदारसंघांच्या नव्या सीमांकनामुळे मतदान 8 फेब्रुवारीपर्यंत लांबले.

आता निवडणुकीला जेमतेम एक महिना शिल्लक असताना, शुक्रवारी संसदेच्या वरच्या सभागृहाने सुरक्षेच्या कारणांमुळे निवडणुका लांबणीवर टाकण्याचा ठराव मंजूर केला. अपक्ष सिनेटर दिलावर खान यांनी हा प्रस्ताव मांडला होता. परंतु, काळजीवाहू सरकारने या ठरावाला विरोध केला. काळजीवाहू सरकार आणि पीएमएल-एन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. सिनेटने पारित केलेला ठराव बंधनकारक नाही आणि याचा अर्थ निवडणुकांना आणखी विलंब होईलच असे नाही.

दिलावर खान यांनी निवडणुकीला उशीर करण्याच्या मागणीमागे थंड हवामान आणि सुरक्षेचे कारण सांगितले. दिलावर म्हणाले की, संविधानाने पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार कायम ठेवला आहे आणि पाकिस्तानचा निवडणूक आयोग सर्व प्रादेशिक लोकांचा समावेश आणि सहभाग सुनिश्चित करण्याच्या आधारावर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यास बांधील आहे. परंतु बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामधील बहुतांश भागात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सर्वात थंड हवामान असते. अशा वातावरणात तिथे निवडणुका झाल्या तर मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते. (हेही वाचा: Political Surveys & Opinion Polls Ban In Pakistan: पाकिस्तानमध्ये निवडणूक आयोगाची राजकीय सर्वेक्षण आणि जनमत चाचण्यांवर बंदी)

यासह दिलावर खान यांनी JUI-F प्रमुख फजलुर रहमान, माजी आमदार मोहसीन दावर आणि इतर राजकीय व्यक्तींच्या जीवाच्या चिंतेचाही उल्लेख केला. दिलावर म्हणाले, ‘आंतरिक मंत्रालयाने प्रमुख राजकारण्यांच्या जीवाला गंभीर धोक्याची नोंद केली आहे, ज्यामुळे राजकीय पक्षांना त्यांच्या मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचा अधिकार वापरण्यात येणाऱ्या आव्हानांमध्ये वाढ झाली आहे.’ विशेषत: केपी आणि बलुचिस्तानमध्ये सुरक्षा दल आणि नागरिकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी पुढे ठळकपणे सांगितले. गुप्तचर यंत्रणांनी दोन्ही प्रांतातील निवडणूक रॅलींवर दहशतवादी हल्ल्यांच्या धोक्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझलचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी शांततापूर्ण वातावरण सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त केली होती.