शनिवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची (Foreign Ministry's Website) वेबसाईट हॅक करण्यात आल्याची बातमी मिळत आहे. पाकिस्तानचे स्थानिक वृर्तमानपत्र 'डॉन'ने याबाबत वृत्त दिले आहे. मात्र सध्या ही वेबसाईट व्यवस्थित चालू असल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. डॉनच्या वृत्तानुसार हा हल्ला भारतात्तूनच झाला असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानच्या आयटी टीमने वेळीच यावर नियंत्रण मिळवले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर वेबसाईट हॅक झाल्यामुळे भारतीय हॅकर्सचे काम असल्याचे पाकिस्तानमध्ये बोलले जात आहे. मात्र त्यामागे नक्की कोण आहे याचा शोध आम्ही घेत आहोत, असे पाकिस्तानने सांगितले आहे.
Pakistan foreign ministry's website hacked
Read @ANI Story | https://t.co/M0ZwvotwkF pic.twitter.com/2Nk9Yqo7pV
— ANI Digital (@ani_digital) February 17, 2019
याबाबत पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी सांगितले, ‘दुसऱ्या देशातून परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आमच्या आयटी टीमने यावर नियंत्रण मिळवले असून, आम्ही यामागील सूत्रधाराचा शोध घेत आहोत.’ पाकिस्तानमधून वेबसाईट सुरळीत सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, ऑस्ट्रेलिया, सऊदी अरब, युके, नेदरलँड येथील वापरकर्त्यांनी वेबसाईट सुरळीत चालत नसल्याचे सांगितले आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सगळीकडे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. या घटनेमुळे भारतातूनच ही वेबसाईट हॅकचा दावा केला जात आहे.