पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाने थैमान (Torrential Rain in Pakistan) घातले आहे. ज्यामुळे या देशातील कोट्यवधी नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये आणीबाणी (Emergency in Pakistan) लावावी लागली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, देशभरील सुमारे 937 नागरिकांनी पुराच्या पाण्यामुळे प्राण गमावले आहेत. यात 343 लहान मुलांचा समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने (NDMA) ने दिलेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतात 14 जूनपासून गुरुवारपर्यंत (25 ऑगस्ट) मुसळधार पाऊस आणि महापूर आदी कारणांमुळे तब्बल 306 नागरिकांचे प्राण गेले आहेत. यंदाच्या मान्सूनमध्ये बलुचिस्तानमध्ये 234 नागरिकांचा मृत्यू झाला तर खैबर पख्तूनख्वा तथा पंजाब प्रांतात अनुक्रमे 185 आणि 165 नागरिकांचे प्राण गेले आहेत.पाकव्याप्त कश्मीरमध्ये 37 आणि गिलगित बाल्टिस्तान प्रदेशात 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानमधील वृत्तपत्र 'डॉन' ने दिलेल्या वृत्तानुसार एनडीएमच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानंदिये ऑगस्ट महिन्यात 166.8 मिमी पाऊस झाला. जो आतापर्यंतच्यासरासरी पावसाच्या 241% अधिक आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये सर्वाधिक प्रभावित क्षेत्र सिंध आणि बलुचीस्तानमध्ये अनुक्रमे 784% आणि 496% अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. (हेही वाचा, Brahmos Missile: ब्राह्मोस क्षेपणास्त्र नजरचुकीने डागले पाकिस्तानात, भारतीय लष्करातील 3 अधिकारी बडतर्फ)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुसळधार पावसामुळे पाकिस्तानच्या दक्षिणी भागात अचानक मोठा पूर आला. ज्यामुळे सिंधमधील 23 जिल्हे आपत्तीग्रस्त घोषीत करण्यात आले. हवामान बदल मंत्री शेरी रहमान यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एनडीएमएमध्ये एक वॉर रुप स्थापन केली आहे. ज्यामुळे देशभरात मदत पोहोचविण्याचे काम केले जाईल. त्यांनी पुढे म्हटले आहे की, भयावह पावसामुळे मदत पोहोचविण्यात अडथळा येतो आहे. तरीही हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अथक परिश्रम करुन मार्ग काढला जातो आहे. मदत पोहोचवली जात आहे.