Pakistan Boxer Steals Money: पाकिस्तानची पुन्हा एकदा जागतिक स्तरावर नाचक्की; इटलीमध्ये ऑलिम्पिक पात्र बॉक्सर Zohaib Rasheed सहकाऱ्याच्या बॅगमधून पैसे चोरून झाला फरार
Pakistan Boxer Steals Money (संग्रहित संपादित प्रतिमा)

Pakistan Boxer Steals Money: भारताचा शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतो. याआधी पाकिस्तानच्या विमान कंपनी PIA मधील क्रू मेंबर पळून गेल्याची बातमी आली होती. तर आता इटलीमध्ये एक पाकिस्तानी बॉक्सर (Pakistani Boxer) महिला सहकाऱ्याचे पैसे चोरून फरार झाला आहे. जोहेब रशीद (Zohaib Rasheed) असे या खेळाडूचे नाव असून, तो ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इटलीला गेला होता.

फेडरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी या चोरीबाबत इटलीतील पाकिस्तानी दूतावासाला माहिती दिली असून, याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. राष्ट्रीय महासंघाचे सचिव कर्नल नसीर अहमद म्हणाले, ‘जोहेब रशीदची ही कृती महासंघ आणि देशासाठी अत्यंत लज्जास्पद आहे.’ तिथल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेणाऱ्या पाच सदस्यीय संघाचा तो भाग होता. जोहेबने गेल्या वर्षी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

अहवालानुसार, महिला बॉक्सर लॉरा इकराम सरावासाठी गेली होती. त्याचवेळी जोहेबने समोरच्या डेस्कवरून रूमची चावी घेतली आणि तो लॉराच्या रूममध्ये गेला. तिथून त्याने तिच्या पर्समधून विदेशी चलन काढले. यानंतर तो हॉटेलमधून गायब झाला. पोलीस जोहेबचा शोध घेत आहेत. तो कोणाच्याही संपर्कात नाही. जोहेब हा पाकिस्तानचा उदयोन्मुख खेळाडू मानला जात होता. (हेही वाचा; Pakistan New Prime Minister: शाहबाज शरीफ सांभाळणार पाकिस्तानची कमान; सलग दुसऱ्यांदा झाले पंतप्रधान)

दरम्यान, याआधी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे दोन वरिष्ठ फ्लाइट अटेंडंट कॅनडात फरार झाले होते. इस्लामाबादहून पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे फ्लाइट कॅनडाच्या टोरंटोमध्ये उतरले व त्यानंतर दोन वरिष्ठ क्रू सदस्य लगेचच पळून गेले, असे पाकिस्तानी एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले होते.