दुबई (Photo Credit : Youtube)

संयुक्त अरब अमीरात (Dubai) मधील अग्रगण्य वृत्तपत्रानुसार, दुबई मधील सर्व विमानतळांवर आता व्यवहारासाठी भारतीय चलन म्हणजे रुपया चालणार आहे. भारतीय चलनाची अशाप्रकारे स्वीकृती ही त्या देशात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. पूर्वीच्या एक्सचेंज दरांमुळे या देशाने याआधी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आणि रक्कम गमावली आहे. गल्फ न्यूज (Gulf News) मधील अहवालानुसार, भारतीय चलन आता दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अल मकतूम विमानतळच्या (Al Maktoum Airport) तीनही टर्मिनल्सवर स्वीकार्य आहे.

गेल्या वर्षी दुबईच्या विमानतळावरून 90 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला, त्यातील 12.2 दशलक्ष प्रवासी भारतीय होते, असे अहवालात म्हटले आहे. दुबईच्या ड्यूटी फ्री दुकानात खरेदी करण्यापूर्वी भारतीय प्रवाशांना चलन पूर्वी डॉलर, दिरहम किंवा युरो मध्ये रुपांतरित करावे लागत होते. डिसेंबर 1983 साली दुबईमध्ये ड्यूटी-फ्री सुरु झाल्यापासून, अशाप्रकारे स्वीकार होणारे भारतीय चलन हे 16 वे चलन असणार आहे. (हेही वाचा: दुबई येथे 9 वर्षीय भारतीय मुलीने जिंकली 10 लाख डॉलरची लॉटरी)

गल्फ कॅरिअर अमीरात दुबई-भारत मार्गावर अजून ज्यादा प्रवासी घेण्याच्या मार्गावर आहे. गेल्या पाच वर्षांपासून द्विपक्षीय अधिकारांमध्ये वाढ झाली नाही, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. दुबईचा फ्लॅगशिप कॅरिअर अमीरात भारतातील 9 ठिकाणांवर सेवा पुरवते. यामध्ये दोन्ही देशातील करारानुसार दुबई आणि भारत एकमेकांना दर आठवड्यास जवळजवळ 1,30,000 सीट्स पुरवते.