North Korean Leader Kim Jong-un (Photo Credits: AFP)

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim- Jong-Un) यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा रंगत होत्या. किम जोंग यांची प्रकृती गंभीर असून चीनमधून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पाठवण्यात आली होती. दरम्यान किम जोंग यांना 11 एप्रिल रोजी मीडियासमोर शेवटचे पाहण्यात आले होते. त्यानंतर 15 एप्रिल रोजी Kim Il-sung यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात किम जोंग गैरहजर राहिल्यानंतर त्यांच्या निधनाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र तब्बल 20 दिवसांतच किम जोंग उन लोकांसमोर आल्याचे वृत्त योनहॅप न्यूज एजन्सीने (Yonhap News Agency) दिले आहे. त्यामुळे किम जोंग यांच्या मृत्यूबाबत रंगणाऱ्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

उत्तर कोरियातील सनचॉन येथे उभारण्यात आलेल्या एका फर्टिलायझर फॅक्टरीच्या उद्घाटन प्रसंगी किंम जोंग उन उपस्थित राहिल्याचे वृत्त कोरिअन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलं आहे. तसंच फॅक्टरीचे उद्घाटन करतानाचे फोटोजही समोर आले आहेत. त्यामुळे किम जोंग उन यांची प्रकृती ठीक असून त्यांच्या निधनाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.

ANI Tweet:

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही दिवसांत इंटरनेटवर विविध रिपोर्ट्स समोर आले होते.  तसंच अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया या देशांच्या मीडिया रिपोर्ट्स देखील निधनाच्या बातमीला दुजोरा देत होते. मात्र उत्तर कोरियाने कोणत्याही वृत्ताची किंवा माहितीची पृष्टी केली नव्हती. इतकंच नाही तर किम जोंग यांच्या अंत्ययात्रेचे फोटोजही सोशल मीडियावर झळकत होते. मात्र ते फोटोशॉप इमेजेस आहेत, हे कालांतराने सिद्ध झाले.