Kim Jong Un (Photo Credit: PTI)

उत्तर कोरियामध्ये (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांचे शासन आहे. किम जोंग उन हे त्यांच्या कुप्रसिद्ध आणि अगदी कठोर निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत. आता हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनकडून हलक्या दर्जाच्या वैद्यकीय वस्तू विकत घेणाऱ्या एका उच्च अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या अधिकाऱ्याने राजधानी प्योंगयांगमध्ये किम जोंग यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हॉस्पिटलसाठी चीनकडून निम्न दर्जाच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. किम जोंग यांना या रुग्णालयातील सर्व गोष्टी व वस्तू या युरोपियन देशांकडून आणायच्या होत्या. त्यांचा असा विश्वास आहे की युरोपियन देशांमधील उत्पादने ही जगातील सर्वोत्तम गुणवत्तेची आहेत.

दक्षिण कोरियाच्या डेली एनके वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी मार्चमध्ये किम जोंग यांच्या उपस्थितीमध्ये प्योंगयांगचे जनरल रुग्णालय पाडण्यात आले होते. किम जोंग यांना फक्त 6 महिन्यांत या ठिकाणी भव्य आणि मोठे रुग्णालय बांधायचे होते. किम यांनी आदेश देऊनही हे रुग्णालय उद्घाटनाच्या तारखेपर्यंत तयार झाले नव्हते. या रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांची तीव्र कमतरता होती. म्हणूनच उत्तर कोरियाच्या आयात-निर्यातीवर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्याने घाईघाईने चीनकडून माल खरेदी केला.

किम जोंग यांनी जेव्हा या रुग्णालयाची आढावा बैठक घेतली तेव्हा त्यांना या चीनकडून मागवलेल्या वस्तूंबद्दल माहिती मिळाली. त्यांनी ताबडतोब त्या अधिकाऱ्याला दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. हा अधिकारी परराष्ट्र मंत्रालयात उपसंचालक होता व त्याचे वय सुमारे 50 वर्षे आहे. उत्तर कोरियाच्या आयात आणि निर्यातीची जबाबदारी या अधिकाऱ्यावर होती. अहवालानुसार या प्रकरणात आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यालाही कामावरून काढून टाकले आहे. (हेही वाचा: https://marathi.latestly.com/world/australia-2-more-death-after-taking-corona-vaccine-jab-246620.html)

किम जोंग उन यांचे बालपण स्वित्झर्लंडमध्ये व्यतीत झाले आहे. म्हणूनच त्यांना विश्वास आहे की, उर्वरित जगाच्या तुलनेत युरोपियन देशांमधील वस्तू उत्तम प्रतीच्या आहेत.  त्यांच्या पक्षाने हे रुग्णालय बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली होती.