Nepal plane crash | (Photo Credit - Twitter)

Nepal Plane Crash: नेपाळ (Nepal) मध्ये रविवारी एक मोठा विमान अपघात (Plane Crash) झाला. या अपघातात एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आले नाही. नेपाळ लष्कराचे प्रवक्ते कृष्ण प्रसाद भंडारी यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, विमान अपघातात कोणीही जिवंत सापडलेले नाही. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे.

पोखरा येथे रविवारी झालेल्या विमान अपघातानंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी मंत्री परिषदेची तातडीची बैठक बोलावली. यासोबतच नेपाळचे गृह मंत्रालय, सुरक्षा कर्मचारी आणि सर्व सरकारी यंत्रणांना तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा -Aircraft Crashes at Pokhara International Airport: पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 68 प्रवाशांसह विमान कोसळले)

नेपाळची राजधानी काठमांडू येथून पोखराला जात असताना दुहेरी इंजिन असलेले एटीआर 72 विमान कोसळले. विमान दुर्घटनेतील आतापर्यंत 68 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 4 जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये पाच भारतीयांचा समावेश आहे. विमान अपघाताचा अहवाल 45 दिवसांत अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आणि नेपाळ विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना केली.

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच भारतीयांपैकी चार उत्तर प्रदेशातील आणि एक बिहारचा आहे. यति एअरलाइन्सच्या विमानात 72 जण होते. दुहेरी इंजिन असलेले टर्बोप्रॉप एटीआर 72 विमान लँडिंगच्या काही वेळापूर्वीच कोसळले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अपघातग्रस्त विमानात बसलेल्या एका भारतीय तरुणाने घटनेपूर्वी फेसबुकवर लाइव्ह केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे विमान अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घटनास्थळावरून कोणीही जिवंत सापडले नाही

विमान अपघातानंतर नेपाळचे लष्कर बचाव कार्यात गुंतले आहे. या विमान अपघातात पाच भारतीयांसह 68 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून त्यांना कोणीही जिवंत सापडले नसल्याचे नेपाळच्या लष्कराने सांगितले.