Nigeria: नायजेरियात या वर्षातील सर्वात मोठा नरसंहार; Boko Haram दहशतवादी संघटनेने तब्बल 110 शेतकऱ्यांची गळा चिरून केली हत्या
File image of Boko Haram extremists | (Photo Credits: PTI)

बोको हराम (Boko Haram) या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा नायजेरियात (Nigeria) नरसंहार सुरू केला आहे. कट्टर इस्लामिक संस्था बोको हरामच्या सदस्यांनी तब्बल 110 शेतकऱ्यांची निर्घृण हत्या केल्याची माहिती यूएनने (UN) दिली आहे. बोको हरामच्या दहशतवाद्यांच्या सशस्त्र गटाने गळा चिरून या लोकांची सार्वजनिकपणे हत्या केली आहे आणि त्यांच्या स्त्रियांनाही आपल्यासोबत घेऊन गेले आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवतावादी समन्वयक एडवर्ड कल्‍लोन म्हणाले की, बोको हरामने कमीतकमी 110 लोकांना निर्घृणपणे ठार मारले. याव्यतिरिक्त, बरेच लोक जखमी झाले आहेत.

कल्‍लोन म्हणाले की, ‘सुरुवातीला मृतांची संख्या 43 होती, जी नंतर वाढून 70 झाली. शेवटी 110 लोकांची हत्या झाल्याचे समोर आले. ही घटना सामान्य नागरिकांवर अत्यंत हिंसक मार्गाने झालेला थेट हल्ला आहे. या हत्यारांना कोर्टात उभे केले पाहिजे.’ सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना कोशोबेची असून ही जागा मैदगुरी (Maiduguri) शहराजवळ आहे. मारेकर्‍यांनी भाताच्या शेतात काम करणाऱ्या लोकांना ठार केले. अल जजीराच्या वृत्तानुसार, या अत्यंत क्रूर हल्ल्यात आधी कामगारांना बांधून ठेवले गेले आणि नंतर त्यांचे गळे कापले.

नायजेरियाचे अध्यक्ष मोहम्मदू बुहारी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हत्येमुळे संपूर्ण देश जखमी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मृतांमध्ये वायव्य नायजेरियातील सोकोतो राज्यामधील कामगार होते, जे सुमारे 1000 किलोमीटर (600 मैल) दूर होते आणि ते कामाच्या शोधात येथे आले होते. या हल्ल्यात आठ जण बेपत्ता आहेत, जहादींनी त्यांना पळवून नेले आहे. सध्या घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे.

सर्व मृतदेह जबरमारी गावात नेण्यात आले आहेत, जिथे त्यांना रविवारी दफन करण्यापूर्वी ठेवले गेले होते. 2009 पासून जिहादी वादात सुमारे 36 हजार लोक मरण पावले आहेत आणि 20 लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.