राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद-नरेंद्र मोदी भेट; चर्चेनंतर मालदीवला 1.4 अब्ज डॉलरची मदत जाहीर
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: ANI | Twitter)

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली (President Ibrahim Mohamed Solih) यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) मालदीवला 1.4 अब्ज डॉलरची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली भारत दौऱ्यावर आले होते. भारत आणि मालदीवने हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षा संबंध अधिक बळकट करण्याचा संकल्प या भेटीत करण्यात आला. त्याचबरोबर व्हिसा सुलभीकरणासह दोन्ही देशांमध्ये एकूण चार करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

दोन्ही देशांचे सुरक्षा हित एकमेकांशी जोडलेले असून हिंद महासागरात सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे कार्य करतील. परस्पराच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांसाठी आम्ही आमच्या देशाचा वापर करु देणार नाही, असे मोदींनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तसंच ते पुढे म्हणाले की, मालदीवच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारताकडून 1.4 बिलियन डॉलर्सचे आर्थिक मदत केली जाईल.

आम्हाला मालदीवबरोबर अधिक व्यापार संबंध हवे आहेत. भारतीय कंपन्यांना मालदीवमध्ये चांगली संधी असल्याचेही मोदींनी सांगितले. महिन्याभरापूर्वी मालदीवच्या राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सोली तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते.

17 नोव्हेंबरला सोली यांच्या शपथविधी सोहळ्याला मोदींनी हजेरी लावली होती. यापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील सोली यांची भेट घेतली होती. पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी भारत विरोधी भूमिका घेतल्याने भारत-मालदीव संबंध बिगडले होते.