Representational Image (Photo Credits: File Photo)

Murder Over 'Lliberal' Lifestyle: पाकिस्तानचे (Pakistan) आर्थिक केंद्र कराची (Karachi) येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या ठिकाणी एका अपार्टमेंटमधून शनिवारी चार महिलांचे मृतदेह सापडले. व्यक्तीने महिलांची नव्या पद्धतीची जीवनशैली आणि सोशल मीडियाचा वापर यांमुळे त्याची आई, बहिणीसह कुटुंबातील चार महिला सदस्यांची हत्या केली, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. स्थानिक पोलिसांनी खुलासा केला की, ‘चारही बळींचे गळे धारदार शस्त्रांनी चिरण्यात आले होते. त्यांच्या शरीरावर अत्याचाराच्या खुणाही आहेत.’ रिपोर्ट्सनुसार, कराचीच्या लियारी भागातील ली मार्केटजवळील झैनब आर्केड अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर सर्व मृतदेह आढळून आले.

मदिहा (18), आयशा (19), शहनाज (51) अशी पीडितांची नावे आहेत. याशिवाय एका 13 वर्षीय मुलीचा मृतदेहही सापडला आहे. अपार्टमेंटमधील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चार महिलांचे मृतदेह आढळून आले. पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी कोणतेही हत्यार सापडले नाही आणि मारेकऱ्याने एकाच शस्त्राने सर्व बळींची हत्या करून पळ काढल्याचे सांगितले. बिलाल अहमद असे आरोपीचे नाव आहे.  कुटुंबप्रमुख मुहम्मद फारूख यांनी पोलिसांना सांगितले की, घटनेच्या वेळी ते आणि त्यांची दोन मुले घरी नव्हते. ते म्हणाले, ‘मृतांमध्ये माझी पत्नी, नात आणि सून यांचा समावेश आहे.’

नंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. बिलाल अहमदला शनिवारी अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुनावणीदरम्यान, अहमदने कोर्टाला सांगितले की त्याने त्याची आई, बहीण, भाची आणि मेहुणीचा गळा चिरला कारण त्यांच्या नव्या पद्धतीच्या जीवनशैलीमुळे त्याचे वैवाहिक जीवन बिघडले होते, आणि त्या त्याला नेहमी वेगवेगळ्या कारणावरून चिडवायच्या. (हेही वाचा: Human Sacrifice in Durg: व्यक्तीने शिवाच्या त्रिशूळाने केली आजीची हत्या; रक्ताने घातला शिवलिंगावर अभिषेक, पोलिसांकडून अटक)

बिलाल हा मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि अति-परंपरावादी असल्याचे तपास पोलीस अधिकारी शौकत अवान यांनी सांगितले. हे प्रकरण ‘ओपन आणि शट’ केस असल्याचेही त्यांनी नमूद केले. क्रूर आणि अमानुष प्रकारच्या या घटनेने संपूर्ण कराची शहर हादरले आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये हा देश दहशतवादासह अनेक गुन्ह्यांशी झुंजत आहे. 2021 सालासाठी पाकिस्तानचा गुन्हेगारीचा दर आणि आकडेवारी 3.98 होती, जी 2020 च्या तुलनेत 6.48% जास्त होती. 2020 साठी पाकिस्तानचा गुन्हेगारीचा दर आणि आकडेवारी 3.74 होती, जी 2019 च्या तुलनेत 2.34% जास्त आहे. त्यात वर्षानुवर्षे वाढ होत आहे.