Representational Image (Photo Credits: File Photo)

Human Sacrifice in Durg: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने अंधश्रद्धेपोटी आपल्याच आजीच्या गळ्यावर त्रिशूळ मारून हत्या केली. यानंतर त्याने जवळच्या शिवमंदिरात जाऊन आजीच्या रक्ताने शिवलिंगाचा अभिषेक केला. इतकेच नाही तर, नंतर घरी परतत असताना त्याच त्रिशूळने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेऊन रुग्णालयात नेले. जिथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे संपूर्ण प्रकरण नंदिनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

दुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमधा परिसरातील नानकट्टी गावात शनिवारी सायंकाळी मानवी बळीची ही घटना घडली. धमधा क्षेत्राचे एसडीपीओ संजय पुंधीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी एका तरुणाने आपली 70 वर्षीय आजी रुक्मणी गोस्वामी यांची त्रिशूळने भोसकून हत्या केल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता आरोपीने स्वत:वरही त्रिशूळाने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी आरोपीला तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

अहवालानुसार, गुलशन गोस्वामी असे आरोपीचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. पोलीस तपासात समोर आले की, आरोपी शिवाची पूजा करत असे. या दिवसांत तो काही खास विधी करत होता. शनिवारी सायंकाळी तो भगवान शिवाचे त्रिशूळ घेऊन घरी पोहोचला आणि त्याच त्रिशूळने आपल्या वृद्ध आजीची हत्या केली. यानंतर, एका भांड्यात रक्त घेऊन तो पुन्हा शिव मंदिरात गेला, तेथे सर्व रक्त शिवलिंगावर अर्पण केले. त्यानंतर काही वेळाने त्याने त्याच त्रिशूळाने स्वतःवर हल्ला केला. (हेही वाचा: Nagpur Shocker: नागपुरात गरिबी बनली मृत्यूचे कारण! आईने ट्यूशन फीबाबत विचारणा केल्यानंतर दहावीच्या मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या)

एसडीओपीनुसार, आरोपी तरुण शिव मंदिराजवळील एका खोलीत आजीसोबत राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याची गंभीर प्रकृती पाहता त्याला रायपूर एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अंधश्रद्धा, खून आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी सकाळपासून गुलशनची वागणूक असामान्य होती. तो विचलित आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ दिसत होता.