Most Liveable City: ऑस्ट्रियाची राजधानी Vienna ठरले जगातील राहण्यायोग्य शहर; जाणून घ्या दिल्ली आणि मुंबईची स्थिती
Vienna (संग्रहित संपादित प्रतिमा)

स्वच्छ परिसर, आजूबाजूला निसर्ग, जिथे प्रदूषण नाही, जास्त गोंगाट नाही, आरोग्याच्या समस्या कमी, अशी ठिकाणी राहायला कोणाला आवडणार नाही. तुम्ही म्हणाल सध्या असे ठिकाण शोधूनही सापडणार नाही. परंतु द इकॉनॉमिस्टच्या (Economist Global Liveability Index) वार्षिक अहवालानुसार, ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना (Vienna) हे जगातील राहण्यासाठी सर्वोत्तम शहर (Most Liveable City) आहे. 2021 मध्ये व्हिएन्ना 12 व्या क्रमांकावर होते. गेल्या वेळी ऑकलंड पहिल्या क्रमांकावर होते, परंतु कोरोना विषाणूच्या काळात लादलेल्या निर्बंधांमुळे ते पहिल्या क्रमांकावरून 37 व्या क्रमांकावर घसरले आहे.

युद्धामुळे युक्रेनची राजधानी कीवचा या क्रमवारीत समावेश नाही. रशियातील कोणतेही शहर पहिल्या दहामध्ये नाही. पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गच्या क्रमवारीतही घसरण झाली. राहण्यासाठी जगातील 10 सर्वोत्तम शहरांमध्ये युरोपमधील 6 शहरे आहेत. त्याचबरोबर कॅनडातील 3 शहरांचा टॉप 10 मध्ये समावेश करण्यात आला आहे. द इकॉनॉमिस्टच्या या क्रमवारीत पॅरिस 19व्या, लंडन 33व्या, न्यूयॉर्क 51व्या आणि चीनचे बीजिंग 71व्या स्थानावर आहे.

या यादीत भारतासह दक्षिण आशियाई देशांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. 140 शहरांच्या यादीत देशाची राजधानी दिल्ली 112 व्या तर मुंबई 117 व्या क्रमांकावर आहे. द इकॉनॉमिस्ट मासिकाने जाहीर केलेल्या वार्षिक ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची आणि बांगलादेशची राजधानी ढाका यांना जगातील सर्वात कमी राहण्यायोग्य शहरांमध्ये स्थान देण्यात आले आहे. या यादीत सीरियाची राजधानी दमास्कस सर्वात तळाशी आहे. (हेही वाचा: World's Largest Building: तब्बल 500 अब्ज डॉलर खर्चून सौदी अरेबिया बांधणार जगातील सर्वात मोठी इमारत)

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EUI) च्या अहवालानुसार, पहिल्या दहा शहरांमध्ये व्हिएन्ना, मेलबर्न, ओसाका, कॅल्गरी, सिडनी, व्हँकुव्हर, टोकियो, टोरंटो, कोपनहेगन आणि अॅडलेड यांचा समावेश आहे. या क्रमवारीत प्रथमच युरोपियन शहराला प्रथमच स्थान मिळाले आहे. राजकीय आणि सामाजिक स्थिरता, गुन्हेगारी, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासह अनेक घटकांच्या आधारे शहरांची क्रमवारी लावली गेली आहे. दरम्यान, व्हिएन्ना हे सुंदर शहर डॅन्यूब नदीच्या काठावर वसले आहे. हे शहर ऑस्ट्रियाची राजधानी आहे. व्हिएन्ना शहर शाही राजवाडे, ऑपेरा आणि आकर्षक संग्रहालयांसाठी ओळखले जाते. इथली कॉफी हाऊस जगभर प्रसिद्ध आहेत.