Miss World 2019: जमैकाची Toni Ann Singh ठरली यावर्षीची विश्वसुंदरी; मिस फ्रांसला दुसरे, तर मिस इंडिया सुमन रावला मिळाले तिसरे स्थान
Miss World 2019 Toni Ann Singh (संग्रहित संपादित प्रतिमा)

अखेर जगाला यावर्षीची मिस वर्ल्ड (Miss World 2019) मिळाली आहे. जमैकाची (Jamaica) टोनी अॅन सिंह (Toni Ann Singh) 2019 ची विश्वसुंदरी ठरली आहे. फ्रान्स, ब्राझील, जमैका आणि नायजेरियासमवेत भारताची सुमन राव (Suman Rao) मिस वर्ल्डच्या स्पर्धेच्या शर्यतीत पाच फायनलिस्ट ठरल्या. यामध्ये सुमन रावला तिसरे स्थान मिळाले, मिस फ्रांस ही दुसऱ्या स्थानावर होती तर मिस जमैका यंदाची विश्वसुंदरी ठरली. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरमन जुलिया मॉर्ले यांनी टोनीचे नाव घोषित केले, तर मागच्या वर्षीची मिस वर्ल्ड व्हेनेसा पोन्से (Vanessa Ponce) हिने टोनीला मिस वर्ल्डचा मुकुट घातला.

मिस वर्ल्ड हा फार मानाचा किताब आहे आणि म्हणूनच जेव्हा टोनीचे नाव घोषित केले गेले तेव्हा क्षणभर तिला आनंदाचा धक्काच बसला. आपले स्वप्न सत्यात उतरले आहे याच्यावर तिचा विश्वासच बसला नाही. शेवटी मिस नायजेरियाने जेव्हा तिला आनंदाने मिठी मारली तेव्हा ती भानावर आली. त्यानंतर स्टेजवर तिने सर्वांना अभिवादन केले. मिस वर्ल्ड स्पर्धेचे हे 69 वे वर्ष होते. यंदाचा हा सोहळा लंडन इथे पार पडला. या स्पर्धेत 100 पेक्षा अधिक देशांच्या सुंदरींनी भाग घेतला होता. आजच्या या कार्यक्रमावेळी 2020 ची मिस वर्ल्ड स्पर्धा थायलंड इथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली.

विश्वसुंदरी टोनी ही फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्र विद्यार्थीनी आहे. तिला वैद्यकीय डॉक्टर व्हायचे आहे. यापूर्वी तिने कॅम्पसमध्ये कॅरिबियन विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तिच्या मोकळ्या वेळात टोनीला गाणे गाणे, स्वयंपाक करणे, ब्लॉगिंग करणे, समाजसेवा करणे आवडते. महत्वाचे म्हणजे ती क्लासिकल ऑपेरा सिंगर आहे. आज या मिस वर्ल्ड गोष्टीचे श्रेय टोनी आपल्या आईला देते. (हेही वाचा: Miss Universe 2019: दक्षिण आफ्रिकेची सौंदर्यवती Zozibini Tunzi ने पटकावला ‘मिस युनिव्हर्स 2019’ चा किताब)

भारताच्या सुमन राव बद्दल बोलायचे झाले तर, सुमन मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याआधी नवी मुंबईतील महात्मा एज्युकेशन सोसायटी मध्ये शिक्षण घेत होती. सुमन ही सीए ची विद्यार्थिनी होती. सुमन रावने Miss Uttar Pradesh 2019 चाही किताब जिंकला आहे. तसेच सुमन हिने 2018 मध्ये पार पडलेल्या मिस नवी मुंबई सौंदर्य स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक मिळवला होता.