Male Nanny Sentenced 707 Years In Prison: कॅलिफोर्नियामध्ये पुरुष आयाला सुनावली 707 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 16 मुलांचा केला विनयभंग
Male Nanny Sentenced 707 Years In Prison (संग्रहित संपादित प्रतिमा)

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये (California) न्यायालयाने लहान मुलांची काळजी घेणाऱ्या एका व्यक्तीला (Male Nanny) 707 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीला 16 मुलांचा विनयभंग आणि एकाला अश्लील चित्रफीत दाखवल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने 34 वर्षीय पुरुष आया मॅथ्यू झकरझेव्स्कीला (Matthew Zakrzewski) 34 गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे. अहवालानुसार, 2 ते 14 वयोगटातील मुले झाकरझेव्स्कीच्या देखरेखीखाली असताना सर्व पीडितांवर अत्याचार झाले. हे सर्व गुन्हे 2014 ते 2019 दरम्यान घडले.

पहिले प्रकरण मे 2019 मध्ये उघडकीस आले, जेव्हा कुटुंबातील एका सदस्याने त्याच्या 8 वर्षांच्या मुलाला अयोग्यरित्या स्पर्श केल्याबद्दल मॅथ्यूविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरु झाल्यावर दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये असे आणखी 11 बळी सापडले. आता 18 नोव्हेंबर रोजी, कॅलिफोर्निया ऑरेंज काउंटी जिल्हा न्यायालयाने, खटल्याच्या सुनावणीदरम्यान, दोषी झाकरझेव्स्कीला दोषी ठरवले.

अॅटर्नी टॉड स्पिट्झर म्हणाले, ‘मॅथ्यूने 17 लहान निष्पापांचे मौल्यवान बालपण हिरावून घेतले आहे. त्याने त्यांचे बालपण 'उद्ध्वस्त' केले. त्याला (मॅथ्यू) या मुलांची काळजी घेण्यात अजिबात रस नव्हता, तर स्वतःच्या लैंगिक समाधानासाठी निर्दोष मुलांची शिकार करणे आणि अशा गोष्टींचे चित्रीकरण करण्यातच त्याला रस होता.’ महत्वाचे म्हणजे स्वतःबाबतच्या आरोपांवरील न्यायालयीन सुनावणीदरम्यान, झाखार्झेव्स्की आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करण्याऐवजी हसत राहिला, इतकेच नाही तर त्याने पीडितांच्या कुटुंबीयांची माफी मागण्यासही नकार दिला. तो म्हणाला, मला माझ्या कृत्याची लाज वाटत नाही आणि मला कोणताही पश्चाताप नाही.’ (हेही वाचा: Israel-Hamas War: युद्धात गाझाच्या शिफा रुग्णालयाची अवस्था बिकट! 30 प्रीमॅच्युअर बेबींना काढण्यात आले बाहेर)

सीबीएस न्यूजनुसार, मॅथ्यूने लहान मुलांची काळजी घेण्यासाठी अनेक सेवा देऊ केल्या होत्या. लहान मुलांची काळजी घेण्याच्या कामाचा आपल्याला 6 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असल्याचे त्याने संकेतस्थळावर नमूद केले होते. तसेच तो 3 महिने ते 14 वर्षे वयोगटातील मुलांची काळजी घेण्यास सक्षम असल्याचेही म्हटले होते. या वेबसाइटवरील माहिती पाहून एके कुटुंबांनी त्याच्याशी संपर्क साधला होता.