पाकिस्तानातील (Pakistan) पाळीव सिंह आणि बिबट्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर लोक असे धोकादायक वन्य प्राणी आपल्या घरात कसे काय पाळू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आता पंजाब प्रांत सरकारने वन्य प्राणी पाळण्यास कायदेशीर मान्यता दिली आहे. वन जीवन कायद्यात बदल करून मंत्रिमंडळाने आता सिंह, चित्ता, वाघ, जग्वार आणि प्यूमा या पाच मोठ्या प्राण्यांना घरात ठेवणे कायदेशीर केले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने वन्यजीव कायदा 1974 मध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. नवीन कायद्यानुसार 50 हजार रुपये शुल्क भरून अशा प्राण्यांसंदर्भात परवाना बनवता येणार आहे. परवान्यामुळे वन्य प्राण्यांचे पालन करण्याची परवानगी मिळेल. मात्र, शहरांमध्ये बांधलेल्या घरांमध्ये प्राणी पाळता येणार नाहीत. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे प्राण्यांच्या संगोपनाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याशिवाय जंगलांच्या संरक्षणासाठी नवीन नियमही करण्यात आले आहेत.
पंजाबच्या मरियम नवाज यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री मरियम औरंगजेब म्हणाल्या की, लोक या प्राण्यांना पूर्वीही त्यांच्या घरात ठेवत होते परंतु गेल्या 70 वर्षांपासून प्राणी पाळण्यासाठी कोणतेही नियम नाहीत. आता सरकारने याबाबत कायदा केला आहे. वन्य प्राण्यांच्या संगोपनासाठी अनेक नियम करण्यात आले आहेत. ही जनावरे शहराच्या हद्दीबाहेर ठेवावी लागणार आहेत. शहरात ज्या लोकांकडे हे प्राणी आधीच आहेत त्यांना ते शहराबाहेर हलवण्यासाठी मुदत दिली जाईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे पाळीव प्राणी दाखवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी या नियमांचे पालन केले नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. (हेही वाचा: Avian Flu At Rescue Centre In Nagpur: नागपूरच्या बचाव केंद्रात एव्हियन फ्लूमुळे 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू; प्राणीसंग्रहालयातील अधिकारी सतर्क)
अहवालानुसार, जंगलांच्या संरक्षणासाठी नवीन नियमही बनवण्यात आले आहेत. पंजाब फॉरेस्ट ट्रान्झिट नियम 2024 अंतर्गत, संपूर्ण पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी चौक्या उभारल्या जातील. सूर्यास्त आणि सूर्योदय दरम्यान वन्य प्राण्यांची वाहतूक बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. याशिवाय जंगलाच्या हद्दीपासून पाच मैलांच्या परिघात करवती किंवा कोळशाच्या भट्ट्या उभारण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, मुस्लीम देशांव्यतिरिक्त अमेरिकेसारख्या देशातही सिंह, चित्ता यांसारखे वन्य प्राणी पाळण्याचा ट्रेंड आहे. एका अहवालानुसार, अमेरिकेतील 12 राज्यांमध्ये सुमारे 5 हजार बिबट्या घरांमध्ये पाळले जातात. घरांमध्ये पाळल्या जाणाऱ्या बिबट्यांपेक्षा तिथल्या जंगलात वाघांची संख्या कमी आहे. तर भारतात याविरोधात कडक कायदा असून सिंह, वाघासारखे प्राणी घरात ठेवणे गुन्हा आहे.