Karachi Blast: कराची विद्यापीठ स्फोटाने हादरले, 2 चिनी नागरिकांसह चौघांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Blast in Pakistan's Karachi University (PC - Twitter)

Karachi Blast: पाकिस्तानातील कराची विद्यापीठात भीषण स्फोट (Blast in Pakistan's Karachi University) झाला आहे. जिओ न्यूजनुसार, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात दोन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक जण गंभीर जखमी आहेत. टीव्ही फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आग दिसत आहेत. कारच्या आतून चारही बाजूंनी धुराचे लोट दिसत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

स्फोटाची अधिक माहिती देताना बचाव कर्मचार्‍यांनी सांगितले की, मस्कान चौरंगीजवळ एका व्हॅनमध्ये 'सिलेंडरचा स्फोट' झाला. मात्र, पोलिसांनी अद्याप या स्फोटाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (हेही वाचा - Afghanistan Mazar-e-Sharif Blast: अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीत 4 स्फोट; 18 जणांचा मृत्यू)

मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी दिले चौकशीचे आदेश -

दरम्यान, सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या घटनेची दखल घेतली असून दहशतवाद विरोधी विभाग आणि एसएसपी पूर्व यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. शाह यांनी जखमींना डाऊ युनिव्हर्सिटी हॉस्पिटल (Dow University Hospital) मध्ये हलविण्याच्या सूचना दिल्या असून कराचीच्या आयुक्तांना चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

कराची पोलीस प्रमुखांनी व्यक्त केली आत्मघाती स्फोटाची शक्यता -

या घटनेबाबत अधिक माहिती देताना, पूर्वेकडील पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) मुकद्दस हैदर यांनी पत्रकारांना सांगितले की, सध्या काहीही सांगता येणार नाही. दरम्यान, गुलशनचे पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणाले की, हा स्फोट दहशतवादी कृत्य होता की, अपघात याचा तपास सुरू आहे. एसपींनी घटनास्थळी बॉम्ब निकामी पथकाला पाचारण केले आहे, तर मृत आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या स्फोटात जखमी झालेल्या तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कराचीचे पोलीस प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार बुरखा परिधान केलेल्या एका महिलेचा आत्मघातकी स्फोटात सहभाग असू शकतो.