Johnson & Johnson कंपनीच्या उत्पादनामुळे कर्करोग होण्याचा धोका; सनस्क्रीनमध्ये आढळले Benzene, परत मागवली सारी उत्पादने
Johnson & Johnson (Photo Credits: Twitter)

'जॉन्सन अँड जॉन्सन' (Johnson & Johnson) या अमेरिकन कंपनीने बुधवारी आपली सनस्क्रीन (Sunscreen) उत्पादने बाजारातून परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काही उत्पादनांच्या नमुन्यांमध्ये कमी प्रमाणात बेंझिन आढळले आहे. हे एक असे केमिकल आहे ज्यामुळे कर्करोगाचा (Cancer) धोका असतो. वृत्तसंस्था एपीच्या म्हणण्यानुसार, सनस्क्रीन उत्पादनांची अंतर्गत तपासणी केली असता त्यामध्ये कार्सिनोजेनिक रसायने आढळली. आता सावधगिरी म्हणून उत्पादने परत मागवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी कोणतेही सनस्क्रीन बनवताना बेंझिनचा वापर केलेला नाही.

कंपनीने परत मागवलेल्या सनस्क्रीन उत्पादनांमध्ये, Aveeno Protect + Refresh Aerosol Sunscreen आणि चार Neutrogena Sunscreen Versions- Beach Defense Aerosol Sunscreen, CoolDry Sport Aerosol Sunscreen, Invisible Daily Defense Aerosol Sunscreen आणि UltraSheer Aerosol Sunscreen यांचा समावेश आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने म्हटले आहे की, लोकांनी या बाधित उत्पादनांचा वापर ताबडतोब थांबवावा. यासह कंपनीने सांगितले आहे की, ग्राहकांना या उत्पादनांबाबत काही शंका असल्यास ते त्यांच्या डॉक्टरांकडे याबद्दल अधिक चौकशी करू शकतात.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रवक्त्याने सांगितले की, या प्रकरणाबाबत माहिती मिळताच आम्ही ताबडतोब आमच्या कच्च्या मालाचे उत्पादन आणि उत्पादन प्रक्रियेचा तपास सुरू केला आहे. यामध्ये आम्ही अंतर्गत चाचण्याही करत आहोत. (हेही वाचा: Johnson & Johnson च्या बेबी शाम्पू मध्ये आढळले हानिकारक रसायन, 'विक्री बंद करा' बाल अधिकार आयोगाची मागणी)

दरम्यान, यापूर्वीही जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका असल्याचा आरोप झाला होता. ब्रूकलिनच्या एका महिलेने आणि तिच्या नवऱ्याने कंपनीवर बेबी पावडरमुळे कर्करोग होत असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर न्यूयॉर्क राज्यातील एका न्यायाधीशांनी कंपनीला 120 मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई करण्याचे आदेश दिले.