Narendra Modi Greets US President Joe Biden (Photo CRedits: PTI and insta)

जो बिडेन (Joe Biden) यांनी आज एका भव्य समारंभात अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती (US President) म्हणून शपथ घेतली. त्याच वेळी कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी उपराष्ट्रपतीपदाची (Vice President) शपथ घेऊन इतिहास रचला. याच बरोबर आज अमेरिकेत बायडेन युग सुरू झाले. शपथविधी सोहळा कॅपिटल हिलमध्ये होत आहे. या शपथविधी सोहळ्यात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा उपस्थित आहेत. बिडेन यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि कॉंग्रेस नेते राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी ट्विट करुन त्यांचे अभिनंदन केले.

बिडेन यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'जो बिडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळल्याबद्दल शुभेच्छा, मी भारत-अमेरिका संबंध अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. पंतप्रधान मोदींनी दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले, 'आम्ही सर्व समान आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि जागतिक शांतता व सुरक्षेत प्रगती करण्यासाठी एकजुट होऊन प्रयत्न करू. भारत-अमेरिका भागीदारी सामायिक मूल्यांवर आधारित आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी अध्यक्ष जो बिडेन यांच्याबरोबर काम करण्यास मी वचनबद्ध आहे.'

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट करुन जो बिडेन यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ‘अमेरिकेतल्या त्यांच्या लोकशाहीच्या नव्या युगास शुभेच्छा. अध्यक्ष बिडेन आणि उपराष्ट्रपती हॅरिस यांचे अभिनंदन.

माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही ट्विटरद्वारे जो बिडेन आणि कमला हॅरिस यांचे अभिनंदन केले.

‘जो बिडेन आणि कमला हॅरिस यांनी यूएसएचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंध बर्‍याच सामायिक मूल्यांवर आधारित आहेत आणि मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी मजबूत होईल,' अशा शब्दांत व्हीपी एम वेंकैया नायडू यांनही शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा: Joe Biden यांनी रचला इतिहास; पहिल्यांदाच अमेरिकन प्रशासनात 20 भारतीय-अमेरिकन लोकांना स्थान)

दरम्यान, शपथविधी सोहळ्यात लेडी गागा आणि जेनिफर लोपेझ यांनीही सादरीकरण केले. लेडी गागाने अमेरिकेचे राष्ट्रगीत गायले, तर जेनिफर लोपेझ हिने This Land Is Your Land  गायले. हे अमेरिकेचे सर्वात प्रसिद्ध लोकगीत आहे. लेडी गागा यावर्षीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिडेन यांच्या मोहिमेचा एक भाग होती.