जम्मू-काश्मीर मधून (Jammu & Kashmir) कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) चर्चा होणार आहे. चीन (China) च्या मागणीनुसार ही चर्चा बंद खोलीत होईल. यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पोलंड यांनी आज सकाळी 10 ची वेळ दिली आहे. IANS च्या सूत्रांनुसार,आज सुरक्षा परिषदेत काश्मीरवर होणारी चर्चा एक दुर्मिळ घटना असणार आहे. यापूर्वी 1965 मध्ये सुरक्षा परिषदेच्या पूर्ण बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली होती मात्र आजची चर्चा ही पूर्ण स्वरुपाची नसून एका बंद खोलीत होणार आहे. परिणामी मीडिया पासून या चर्चेतील विषय दूर ठेवण्यात येतील. (कलम 370 रद्द केल्याने संतप्त झालेल्या पाकिस्तानला एका दिवसात 7400 करोड रुपयांचा फटका)
कलम 370 हटवण्याआधी पासूनच काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. याकरिता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्प यांची सुद्धा भेट घेतली होती. मात्र या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप नाकारण्याचा पवित्रा भारताने स्वीकारला आहे. काश्मीरचा मुद्दा अंतर्गत स्वरुपाचा असल्याने त्यात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही. वास्तविक शिमला करारानुसार काश्मीर प्रश्न पाकिस्तानसोबत संवादाच्या माध्यमातून सोडवला जाऊ शकतो. इतर देशांची मध्यस्थी घ्यायची झाल्यास त्यासाठी दोन्ही देशांची संमती असणे आवश्यक आहे. यामुळेच चीनच्या मदतीनं काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे प्रयत्न पाकिस्तान करत आहे. अखेर चीननं याबद्दल बैठक घेण्याची मागणी केली.
दरम्यान या बैठकीत हाँगकाँगमध्ये गेल्या 10 दिवसांपासून लोकशाहीच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दादेखील संयुक्त राष्ट्रात उपस्थित केला जाणार आहे. हाँगकाँगच्या विषयावरुन संयुक्त राष्ट्रानं महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.