धक्कादायक! अजूनही अविवाहित असल्याच्या रागातून आई-वडिलांनी केली चित्रपट दिग्दर्शक मुलाची हत्या; मृतदेहाचे तुकडे करुन कचऱ्यात फेकून दिले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पालक-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना इराणमधून (Iran) समोर आली आहे. येथे एक लोकप्रिय फिल्ममेकर बाबक खोर्रमदीन (Babak Khorramdin) यांचा त्यांच्या आई-वडिलांनी खून केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर 47 वर्षीय खोर्रमदीन यांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते फेकून देण्यात आले होते. या इराणी फिल्ममेकरचा मृतदेह पश्चिमी तेहरानमधील एकबतान शहरात कचऱ्याच्या पिशवीत आणि एक सुटकेसमध्ये सापडला. आपला मुलगा अजूनही अविवाहित आहे आणि तो लग्नास तयार होत नाही म्हणून या आई-वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केली.

खोर्रमदीन अविवाहित होते आणि त्यांचे पालक सतत लग्नासाठी त्यांच्यावर दबाव आणत होते. परंतु खोर्रमदीन नेहमीच लग्नास नकार देत राहिले. याच मुद्यावरून दोघांचे भांडण झाले. या वादामुळे खोर्रमदीन यांचे पालक इतके संतापले की त्यांनी मुलाचा खून केला. तेहरान क्रिमिनल कोर्टाचे प्रमुख मोहम्मद शहरियारे म्हणाले की, खोर्रमदीनच्या वडिलांनी खुनाची कबुली दिली आहे. वडिलांनी सांगितले की, त्यांनी प्रथम आपल्या मुलाला भूल देण्याचे इंजेक्शन दिले व नंतर मुलावर वार केले. यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून ते फेकून दिले.

या निवेदनानंतर पालकांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार वडिलांनी सांगितले की, आमचा मुलगा अविवाहित होता. तो आम्हाला सतत त्रास देत होता. आमचे जीवन धोक्यात होते. आम्हाला एक दिवसही सुरक्षित वाटत नव्हते. तो नेहमी त्याला जसे हवे तसेच करीत असे. त्यानंतर मात्र त्याची आई आणि मी ठरवले की, आम्हाला त्याच्यापासून सुटका करून घेणे आवश्यक आहे. आम्हाला यापुढे आमची प्रतिष्ठा गमवायची नव्हती. आपण केलेल्या कृत्याचा आपल्याला अजिबात पश्चाताप नसल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: पाकिस्तानी TikTok स्टार Hamidullah चा खोट्या आत्महत्येच्या स्टंट चुकला आणि गोळी लागून जागीच जीव गेला

पत्रकार गोलनार मोतेवल्ली यांनी केलेल्या ट्विटनुसार, या पालकांनी त्यांची मुलगी आणि जावयाचीही हत्या केली आहे. दरम्यान, बाबाक खोर्रमदीन यांचा जन्म 1974 मध्ये तेहरानमध्ये झाला होता. त्यांनी 2009 मध्ये तेहरान विद्यापीठातून सिनेमात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर 2010 मध्ये ते लंडनला गेले. नंतर तो लंडनहून परत आले आणि मुलांना शिकवण्याचे काम करू लागले. Colorless Blonde Corrupted, Tuesday: Mom, Rosen, Cut या त्यांच्या शॉर्ट फिल्म्स प्रसिद्ध आहेत.