इराणमध्ये (Iran) गेल्या तीन महिन्यांपासून हिजाबबाबत (Hijab) मोठा वाद आणि आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये शेकडो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या निषेधाचे पडसाद जगातील इतर देशांमध्येही दिसून आले आहेत. आता इराण सरकार आंदोलकांसमोर झुकले आहे. देशातील हिजाबबाबतचा हा वाद थांबताना दिसत आहे. इराण सरकारने जुन्या हिजाब कायद्याचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यानुसार येथे महिलांना डोके झाकणे बंधनकारक आहे.
यासोबतच कठोर ड्रेस कोडच्या विरोधात अनेक महिन्यांच्या निषेधानंतर इराणचे नैतिकता पोलिसांचे युनिट्स बरखास्त करण्यात आले आहे. स्थानिक मीडियाने ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्था ISNA ने शनिवारी ऍटर्नी जनरलचा हवाला देऊन सांगितले की, ‘नैतिकतेचा पोलिसांचा न्यायव्यवस्थेशी काहीही संबंध नाही.’ 22 वर्षीय मेहसा अमिनी हिचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर 16 सप्टेंबरपासून इराणमध्ये हिजाबविरोधात निदर्शने सुरू आहेत.
हिजाब कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली नैतिकता पोलिसांनी मेहसाला अटक केली होती. त्यानंतर आरोपानुसार तिच्यावर पोलीस कोठडीमध्ये अत्याचार झाले व त्यातच तिचा मृत्यू झाला. आता इराणचे अॅटर्नी जनरल मोहम्मद जफर मोंटाजेरी म्हणाले की, सरकार देशात लागू असलेल्या ड्रेस-कोड कायद्याचा आढावा घेत आहे आणि बदलांवर विचार केला जात आहे. महिलांनी डोके झाकण्याबाबतचा कायदा बदलण्याची गरज आहे की नाही या मुद्द्यावर संसद आणि न्यायव्यवस्था दोन्ही काम करत आहेत, असे अॅटर्नी जनरल मोंटॅझी यांनी नैतिकता पोलिसांच्या तुकड्या रद्द करण्याच्या घोषणेच्या एका दिवसानंतर सांगितले. (हेही वाचा: तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यानंतर अफगाण मुलींच्या अल्पवयीन विवाहात वाढ; अहवालात धक्कादायक खुलासा)
मेहसा अमिनी हिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनात आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे. इराणची सर्वोच्च सुरक्षा संस्था, सर्वोच्च राष्ट्रीय परिषदेने शनिवारी सांगितले की, निदर्शनेतील मृतांची संख्या 200 पेक्षा जास्त आहे. या आकडेवारीत सुरक्षा अधिकारी, नागरिक आणि फुटीरतावादी तसेच दंगलखोरांचा समावेश आहे.