Ukrainian Aeroplane shot down in Tehran. (Photo Credit: PTI)

युक्रेनच्या विमान (Ukrainian Airplane) कंपनीच्या बोईंग 737 या प्रवासी विमानाचा बुधवारी (8 जानेवारी) अपघात झाला होता. आता याबाबत इराणी लष्कराकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. आपल्याकडून युक्रेनचे प्रवासी विमान चुकून पाडले गेल्याची कबुली इराणी सैन्याने दिली आहे.  हे विमान बुधवारी उड्डाणानंतर लगेचच कोसळले होते. या विमानातील 167 प्रवासी आणि 9 विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

युक्रेन एअरलाइन्सचे बोईंग 737 या विमानाने तेहरान विमानतळावरून उड्डाण घेतले होते. उड्डाणानंतर अवघ्या काही वेळातच हे विमान कोसळले होते. तेहरानच्या इमाम खुमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली होती. (हेही वाचा - US-Iran Conflict: इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला)

 या विमानामध्ये 82 इराणी, 63 कॅनडाचे, 11 युक्रेन, 10 स्वीडन, 4 अफगाणिस्तानचे, जर्मन व ब्रिटनचे प्रत्येकी 3 नागरिक होते. दरम्यान, या विमान अपघातानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडू यांनीदेखील हे विमान इराणने पाडल्याची माहिती हाती आली असल्याचे सांगितले होते. इराण टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणमध्ये वाद चिघळत गेला. त्यामुळे या वादाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ले केले. बुधवारी एक विमान इराणच्या लष्करी तळाजवळ आल्याने इराणी सैन्याने ते विमान क्षेपणास्त्राद्वारे पाडले. त्यानंतर आज इराण सैन्याने आपली चुक मान्य केली आहे.