सर्वाधिक लांबीचा सागरी पूल (Photo Credit: IANS)

जगातील सर्वाधिक लांबीचा पूल प्रवासासाठी खुला झाला आहे. हा पूल चीनच्या जुहाई शहराला हाँगकाँग आणि मकाऊशी जोडतो. या पूलाचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 9 वर्षांचा कालावधी लागला असून यासाठी तब्बल 20 अब्ज डॉलर (दीड लाख कोटी रुपये) खर्च करण्यात आला आहे. हा पूल 55 किलोमीटरचा असून या पूलाचं काम 2009 मध्य सुरु करण्यात आलं होतं. पर्ल रिव्हर एस्चुरीच्या लिंगदिंग्यांग प्रांतात हा पूल उभारण्यात आला आहे.

हा पूल उभारण्यासाठी तब्बल चार लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर 80 हजार टन पाईप्स वापरण्यात आले आहेत. पूल उभारण्यासाठी समुद्रात 6.7 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला असून हा बोगदा दोन कृत्रिम बेटांना जोडतो. या पूलामुळे हाँगकाँग ते जुहाई हा 3 तासांचा प्रवास फक्त 30 मिनिटांत करणे शक्य होणार आहे.

समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात लांब पूल हाँगकाँग आणि मकाऊसह दक्षिण चीनमधील 11 शहरांना जोडतो. या पूलामुळे व्यापार वाढणार असून त्याचा फायदा चीन अर्थव्यवस्थेला होणार आहे. मात्र या पूलावरुन प्रवास करण्यासाठी वाहन चालकांना विशेष परवान्याची आवश्यकता भासणार आहे. विशेष म्हणजे पादचारी या पूलाचा वापर करु शकणार नाहीत.

या पुलाचं काम सुरु असताना सात मजूरांचा मृत्यू झाला असून 129 जण जखमी झाले होते.