US Mass Shooting Video (PC - X/@k0ssed)

US Mass Shooting Video: अमेरिकेतील टेनेसी राज्यातील मेम्फिस (Memphis) शहरात एका ब्लॉक पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात (Firing) 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मेम्फिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑरेंज माऊंड परिसरातील कार्नेस अव्हेन्यू आणि ग्रँड स्ट्रीट परिसरात हा गोळीबार झाला. या घटनेत 14 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेम्फिस पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या घटनेत जखमी झालेल्यांपैकी तीन जणांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तसेच आणखी 11 जणांना खासगी वाहनांतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, हा गोळीबार एका पार्टीत झाला जेथे सुमारे 300 लोक जमले होते. अधिकाऱ्यांनी 7:19 वाजता (स्थानिक वेळेनुसार) घटनास्थळी धाव घेतला. यावेळी पोलिसांना बंदुकीच्या गोळीने जखमी झालेले पाच जण सापडले. त्यापैकी तिघांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तसेच दोन पुरुषांना घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा -Chaotic Fight In Georgia Parliament: जॉर्जियाच्या संसदेत विदेशी एजंट लॉ वर चर्चेदरम्यान खासदारांमध्ये हाणामारी, पहा व्हिडिओ)

मेम्फिसचे पोलिस प्रमुख सेरेलिन डेव्हिस यांनी सांगितले की, या कार्यक्रमात किमान दोन जणांनी गोळीबार केला. हा हिंसाचार कशामुळे झाला हे अस्पष्ट आहे. यानंतर शनिवारी संध्याकाळी डेव्हिस म्हणाले, या गोळीबारात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

डेव्हिस यांनी सांगितलं की, विभागाला घटनास्थळावरून व्हिडिओ फुटेज मिळाले असून ते जबाबदार असलेल्यांचा शोध घेत आहेत. डेव्हिसने घटनेचे फुटेज किंवा माहिती असलेल्या कोणालाही कायद्याच्या अंमलबजावणीशी संपर्क साधण्यास सांगितले.