Tesla चे भविष्य धोक्यात! भारत सरकारने फेटाळली Elon Musk यांची आयात शुल्कात सूट देण्याची मागणी
Elon Musk (Photo Credits: Getty Images)

Elon Musk यांची आयात शुल्कात सूट देण्याची मागणी भारत सरकारने फेटाळली अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) ला भारत सरकारकडून मोठा झटका बसला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत सरकारने एलोन मस्क (Elon Musk) यांची आयात शुल्कात सूट देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.

सरकारच्या मते, देशाचे नियम आधीच उत्पादकांना अंशतः तयार केलेली वाहने देशात आणण्याची परवानगी देतात. त्याच वेळी, तुम्ही स्थानिक कर भरून असेंबलचे काम देखील करू शकता. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क (CBDT) चे अध्यक्ष विवेक जोहरी म्हणाले, "आम्ही या मुद्द्यावर विचार केला आहे. आयात शुल्क हा परदेशी कंपन्यांसाठी अडथळा नाही. सध्याची आयात शुल्क रचना असूनही, देशात गुंतवणुकीचा ओघ सुरूच आहे." विवेक जोहरीच्या म्हणण्यानुसार, टेस्लाने अद्याप भारतातील स्थानिक उत्पादन आणि खरेदी योजनांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. (वाचा - TIME Person of the Year: टेस्लाचे Elon Musk ठरले यंदाचे टाइम 'पर्सन ऑफ द इयर'; 4 लस शास्त्रज्ञ ‘Heroes of the Year’ ने सन्मानित)

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी भारत सरकारकडे आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. यापूर्वी, मस्कने असेही म्हटले होते की, भारतात उत्पादन लाँच करण्यासाठी त्यांना सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मात्र, त्यानंतर तेलंगणासह विविध राज्यांनी मस्कला प्लांट उभारण्यासाठी आमंत्रित केले होते.

एलोन मस्क म्हणतात की, भारतातील आयात शुल्क जगातील कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. भारतात आयात केलेल्या कारवर सध्या 60 ते 100 टक्के शुल्क आकारले जाते. यात कपात करण्याची मागणी एलोन मस्क करत आहेत.