Ford Layoffs: आयटीनंतर आता ऑटो सेक्टरमधील नोकऱ्यांवर संकट; हजारो लोकांना कामावरून काढण्याची फोर्ड मोटर्सची योजना
Ford (Photo Credits: Ford)

गेल्या अनेक महिन्यांपासून आयटी कंपन्यांमध्ये मोठी नोकर कपात सुरु आहे. नुकतेच गुगलने ते त्यांच्या 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची घोषणा केली आहे. आता टेकनंतर ऑटो क्षेत्रातील (Auto Sector) कंपन्याही मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या तयारीत आहेत. अमेरिकन कार निर्माता कंपनी फोर्ड मोटरने (Ford Motor Company) 3200 लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना तयार केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे म्हटले जात आहे की फोर्ड आता इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि या दिशेने काम करण्यासाठी खर्च कमी करण्यासाठी लोकांना कामावरून कमी करण्याचा मोठा निर्णय घेत आहे.

फोर्ड मोटर कंपनीच्या या छाटणीचा कंपनीच्या उत्पादन विकासात काम करणाऱ्या लोकांवर आणि कंपनीच्या जर्मनी कार्यालयात काम करणाऱ्या प्रशासकावर परिणाम होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोर्डच्या या निर्णयामुळे युरोपमधील 65 टक्के डेव्हलपमेंट नोकऱ्यांवर परिणाम होईल. फोर्ड कंपनी प्रशासक विभागातील 700 आणि विकास कार्य विभागातील 2500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

IG Metall ने दिलेल्या निवेदनानुसार, फोर्ड मोटर जर्मनीहून अमेरिकेत आपला डेव्हलपमेंट उपक्रम हलवण्याचा विचार करत आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात फोर्डने अमेरिकेतील सुमारे 3,000 लोकांना कामावरून काढून टाकले टाकले होते. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम फार्ले म्हणाले की, कंपनी नफा वाढवण्यासाठी $3 अब्ज कपात करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून कंपनी इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात $50 अब्ज गुंतवणूक करू शकेल. (हेही वाचा: Tech Layoffs: दररोज 3000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत टेक कंपन्या; जानेवारीमध्ये 65 हजारांहून अधिक लोकांनी गमावल्या नोकऱ्या)

मात्र, दुसरीकडे कंपनीने युरोपमध्ये नोकर कपातीची शक्यता नाकारली आहे, कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. म्हणजेच 3200 लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे प्रकरण मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. अमेरिकन कार कंपनी युरोपमध्ये सुमारे 45,000 लोकांना रोजगार देते.